‘स्वाभिमानी’चे चक्काजाम आंदोलन: पुणे-बेंगळुरू महामार्गावरच बसल्या पंगती; तोडगा काढण्यासाठी शाहू महाराजांचा पुढाकार

0
89

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस दराचे आंदोलन तीव्र केले असून, गुरुवारी दुपारपासून पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला. शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथे हजारो शेतक-यांची महामार्गावरच पंगत बसली.

घरातून बांधून आणलेली शिदोरी आणि आंदोलकांनी रस्त्यावर शिजवलेली भात-आमटी खावून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतक-यांनी व्यक्त केला. दरम्यान, शेतक-यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली.

मागील हंगामातील प्रतिटन ४०० रुपये आणि नवीन हंगामात उसाला एकरकमी ३५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन तीव्र केले आहे. गुरुवारी दुपारी पुणे-बेंगळुरू महामार्गावर आंदोलकांना रास्ता रोको केला.

हजारो आंदोलकांनी महामार्गावरच ठाण मांडल्यामुळे पोलिसांनी वाहतूक अन्य पर्यायी मार्गाने वळवावी लागली. तरीही महामार्गावर दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा आहेत.

पोलिसांचा विरोध झुगारून आंदोलकांनी महामार्गावर भात आणि आमटी तयार केली. तसेच सोबत आणलेली शिदोरी सोडून महामार्गावर पंगती बसवल्या. अनेक आंदोलक येताना तांदूळ आणि भाज्या घेऊन आले आहेत, त्यामुळे ऊस दरावर तोडगा निघेपर्यंत महामार्गावरच ठाण मांडण्याचा निर्धार आंदोलकांनी केला आहे.

श्रीमंत शाहू महाराज यांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली. ऊस दराच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही त्यांनी दिली. दरम्यान, काही साखर कारखानदारांची शासकीय विश्रामगृह येथे बैठक सुरू असून, शेट्टी यांच्या मागणीवर चर्चा सुरू आहे. लवकरच तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here