कोल्हापूर : ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच चर्चा सुरू केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी हे मात्र या बैठकीला आले नसून ते राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मारून आहेत.
स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जालंदर पाटील, सावकर मादनाईक, स्वस्तिक पाटील हे स्वाभिमानीचे पदाधिकारी सध्या जिल्हाधिकारी रेखावार आणि जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्याशी चर्चा करत आहेत.
गेल्या हंगामातील उसाला प्रति टन ४०० रुपये देण्याची संघटनेची मागणी असून यावर काही तोडगा निघतो का याची चाचपणी या बैठकीमध्ये सुरू आहे.
जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून उठणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी जाहीर केल्यामुळे आणि वाहतुकीचा प्रचंड खोळंबा झाल्यामुळे प्रशासनाने आपल्या हालचाली गतिमान केले आहेत.
आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
हजारो शेतक-यांची महामार्गावरच पंगत बसली. घरातून बांधून आणलेली शिदोरी आणि आंदोलकांनी रस्त्यावर शिजवलेली भात-आमटी खावून आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार शेतक-यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शेतक-यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी आंदोलनस्थळी जाऊन राजू शेट्टी यांची भेट घेतली.