भुईंज: येथील पाणी पुरवठा आवारात अज्ञात दोन ते तीन जणांनी अनिल नामदेव कुचेकर (वय ३८, रा. भुईंज, ता. वाई) याचा ऊस, झाडांच्या फांद्यांनी व दगडाने निर्घृण खून केला. ही घटना मध्यरात्री घडली असून, शनिवारी पहाटे हा प्रकार समोर आला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भुईंज येथील कृष्णा नदीकाठी असलेल्या ग्रामपंचायतींच्या पाणी पुरवठा स्कीमच्या आवारातून पहाटे काहीजण चालत निघाले होते.
त्यावेळी तेथे एका व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह त्यांना दिसला. या प्रकाराची माहिती भुईंज पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसही तातडीने घटनास्थळी पोहोचले. भुईंजमधील ग्रामस्थ त्या ठिकाणी आल्यानंतर हा मृतदेह अनिल कुचेकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. अनिल हा हमालीचे काम करत होता. अनिलचा मृतदेह पंपहाऊसच्या नजीक मैदानाशेजारी आढळून आला.
मृतदेहापासून सुमारे शंभर फूट अंतरावर त्याला मारहाण करण्यात आल्याच्या खूना आहेत. ऊस, झाडाच्या फांद्या, एक मध्यम आकाराचा दगड, तसेच लहान दोन-तीन दगड तसेच नळाच्या पाइपचे तुकडे घटनास्थळी आढळून आले आहेत.
मारहाणीनंतर मृतदेह सुमारे शंभर फूट अंतरावर फरफटत नेऊन टाकण्यात आला. अत्यंत निर्दयीपणे त्याचा खून करण्यात आला आहे. कोणत्या कारणातून खून झाला व कोणी केला, हे अद्याप समोर आले नाही. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक विशाल भंडारे, नितीन जाधव, चंद्रकांत भोसले,संजय धुमाळ आदींनी धाव घेऊन पंचनामा केला.
शेवटचे त्याला दारूच्या दुकानावर पाहिले
शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास त्याला काहींनी शेवटचे दारूच्या दुकानावर पाहिले होते. त्यावेळी त्याच्यासोबत हमाली करणारे त्याचे दोन सहकारी होते. त्यामुळे हा खून कोणी केला, याचा लवकरच उलगडा होणार आहे.