प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी सुरू केलेल्या लढ्यातून शेतकऱ्यांच्या पदरात तब्बल ९७ कोटी २६ लाख रुपये पडणार आहेत.
दोन महिने शेट्टी यांनी रस्त्यावरचा संघर्ष केला. पण, शेवटपर्यंत काहीतरी पदरात पडल्याशिवाय त्यांनी तलवार म्यान केली नाही. मध्यंतरी विविध कारणांमुळे ‘स्वाभिमानी’च्या आंदोलनाला काहीसी मरगळ आली होती. मात्र, यंदा ती झटकली असून, पुढच्या हंगामातही ही धग कायम राहणार हे निश्चित आहे.
शेतमालाला दर नसल्याने शेतकरी आर्थिक अरिष्टात आहे. त्यात रासायनिक खते, शेती पंपाच्या वीज दरात केलेली भरमसाठ वाढ आणि शेतमजुरांची वानवा यामुळे दिवसेंदिवस शेती अंगावर येत आहे.
अशा परिस्थितीत किमान हमीभाव असलेल्या ऊस पिकाकडे येथील शेतकरी वळला आहे. या पिकातूनही शेतकऱ्यांचा ताळेबंद सुधारला नाही. शेतकऱ्यांच्या दृष्टीने एफआरपी व आरएसपी हे दोन कायदे सुरक्षित असले तरी यंदा साखरेसह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळत आहे, तर त्यातील नफाही शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, ही भूमिका घेऊन राजू शेट्टी यांनी गेले दोन महिने साखर कारखानदार व राज्य शासनाशी संघर्ष सुरू ठेवला.
अखेर, तीन हजार रुपयांपेक्षा कमी दर दिलेल्या कारखान्यांनी मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला प्रतिटन १००, तर त्यापेक्षा अधिक दर दिलेल्यांनी ५० रुपये देण्यावर एकमत झाले.
येत्या दोन महिन्यात साखर आयुक्तांची परवानगी घेऊन हे पैसे शेतकऱ्यांना द्यायचे आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत दिलेले पैसे पाहता, अजून ९७ कोटी २६ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. गेले दोन महिने राजू शेट्टी यांनी केलेल्या संघर्षाचे हे फलित म्हणावे लागेल.
चळवळ टिकली पाहिजे..
अंतर्गत वादामुळे शेतकरी संघटनांचे तुुकडे पडल्याने शेतकऱ्यांची ताकद विखुरली गेली. पण, सगळ्यांचा उद्देश एकच आहे, त्यातूनच ‘स्वाभिमानी’ने हे मोठे आंदोलन हातात घेतले. त्याला ‘आंदोलन अंकुश’सह इतर संघटनांनी बळ दिले. जय शिवराय संघटनेने कायदेशीर लढाई करत शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली.
‘जवाहर’, ‘दत्त’च्या शेतकऱ्यांना २९ कोटी
जवाहर व दत्त कारखान्याला मागील हंगामात गाळपास पाठवलेल्या ऊस उत्पादकांना तब्बल २९ कोटी मिळणार आहेत. त्यापाठोपाठ ‘गुरुदत्त’ला ७.०३ कोटी, तर ‘शरद’ला ६.०५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
असे राहिले ‘स्वाभिमानी’चे ऑगस्टपासून आंदोलनाचे टप्पे..
- साखर आयुक्तांना पत्र
- प्रत्येक साखर कारखान्याला निवेदन देऊन मागणी
- प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयावर धडक मोर्चा
- साखर कारखान्यांवर ढोल बडाओ आंदोलन
- ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा
- ऊस परिषद
- ऊस परिषदेच्या ठिकाणी ऐन दिवाळीत ठिय्या आंदोलन
- चक्का जाम आंदोलन
- राष्ट्रीय महामार्ग रोको
कारखानानिहाय अशी द्यावी लागणार रक्कम, कोटीत :
आजरा : १.६८
भोगावती : २.२९
राजाराम : २.०९
शाहू : ४.५६
दत्त, शिरोळ : ११.४८
बिद्री : ४.४०
जवाहर : १८.०१
हमीदवाडा : २.३०
कुंभी : ३.००
पंचगंगा (रेणुका शुगर्स) : ४.१३
शरद : ६.०५
वारणा : ६.७४
अथणी (गायकवाड) : ३.७९
डी. वाय. पाटील : २.३५
दालमिया : ५.०७
गुरुदत्त : ७.०३
इको केन, चंदगड : १.७३
ओलम ग्लोबल, राजगोळी : ३.३१
संताजी घोरपडे : ३.४२
अथणी (तांबाळे) : १.७२
अथर्व (दौलत) : २.०२