नारायण गावस पणजी: बोरी येथील नवीन पुलाचा आराखडा हा चांगला असून यात लाेकांची घरे तसेच शेतजमीनी नष्ट होणार नाही. काही लाेक विनाकारण विराेध करत आहेत, असे जलस्त्राेत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बाेरी पुल हा खूप जूना झाला असून आता नवीन पुल बांधणे गरजेचे आहे. याचा आराखडा तयार केला जात आहे.
यात काही जणांनी घरे जाणार तसेच शेत जमिनी नष्ट होणार असे म्हणून विरोध केला आहे तो चुकीचा आहे. या पुलाच्या नवीन बांधकामाने एका घराला फटका बसू शकतो. त्याचे नियोजनही केले जाणार आहे. त्यामुळे कुठल्याच अभ्यासाशिवाय विकासकामांना विरोध करु नये, असेही मंत्री शिरोडकर म्हणाले.
बाेरी पूल जुना असल्याने माेडकळीस आला आहे. कधींही दुर्घटना घडली तर मग सरकारला जबाबदार ठेवले जाणार. त्यामुळे या ठिकाणी पुल बांधणे गरजेचे आता. विरोध सुरुवातीला प्रत्येक विकास कामांना होत असतो. नंतर तेच लाेक त्याचा लाभ घेत असतात. या अगोदर कोकण रेल्वेला विरोध झाला होता. पण नंतर या विरोधकांनाही या रेल्वेचे महत्व कळले, असे मंत्री शिरोडकर म्हणाले.
तिळारी कालव्याच्या दुरुस्तीचे काम २० डिसेंबर पर्यंत संपणार आहे. पण राज्यात पाणी साठा भरपूर आहे. त्यामुळे पाण्याची कमतरता भासणार नाही. तिळारी कालव्याची दुरुस्तीचे काम तातडीने केेले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची समस्या भासू दिली जाणार नसल्याचे यावेळी मंत्री शिराेडकर म्हणाले. तसेच लवकर नवीन धरणांचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्याचा आराखडा आम्ही तयार केलेले आहे, असे मंत्री सुभाष शिराेडकर यांनी सांगितले.