कोल्हापूर :  शिरोली-अंकली महामार्गासाठी लवकरच भूसंपादन होणार

0
58

कोल्हापूर : शिरोली ते अंकली या नव्या चौपदरी राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच भूसंपादनाला सुरुवात होणार आहे. 

भूसंपादनाची ही प्रक्रिया तातडीने करून महामार्गाच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्याच्या दृष्टीने तयारी करा, अशा सूचना खासदार धैर्यशील माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

माने यांनी तीन राष्ट्रीय महामार्गांसंबंधातील अडचणींबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी दुपारी बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये शेतकरी, ग्रामस्थांच्या विविध अडचणींबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माने म्हणाले, कोल्हापूर-सांगली हा प्रचंड वाहतुकीचा रस्ता असूनही तो राज्य मार्ग होता. त्याचेही काम पूर्णपणे मार्गी लागले नव्हते. त्यामुळे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी करून शिरोली ते सांगली रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे.

त्यानंतर या रस्त्याच्या चौपदरीकरणासही मजुरी मिळाली असून, त्याचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्षांना भेटून भूसंपादनाची परवानगी सुद्धा मिळविण्यात आली आहे.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंदरकर व अन्य अधिकारी, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, उपजिल्हाधिकारी विवेक काळे, शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, हातकणंगले व शिरोळ तालुक्याचे भूसंपादन अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

महसूल, भूसंपादन विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी समन्वयाने या रस्त्याचे भूसंपादन लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही माने यांनी दिल्या. आंबा, पैजारवाडी चौकात या रस्त्याच्या कामामध्ये असणाऱ्या शासकीय अडथळ्यांचे निराकरण करण्यासही त्यांनी सांगितले.

शिरोली-कासेगाव दरम्यानच्या गावांत अधिकारी जाणार

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ कागल-सातारा या रस्त्याच्या सहापदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या शिरोली ते कासेगाव मार्गावरील गावांतील नागरिकांच्या तसेच शेतकऱ्यांच्या समस्याही यावेळी जाणून घेण्यात आल्या.

दि. २ डिसेंबरला प्रत्येक गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन तेथील समस्यांची पाहणी करून निराकरण करण्याच्या सूचना माने यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी पुलाची शिरोली, वडगाव, घुणकी, किणी, कणेगाव, येलूर, वाघवाडी, पेठ नाका व कासेगाव येथील शेतकरी, ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here