मिलिंद वैद्य यांच्या जाण्याने कृषी क्षेत्र प्रयोगशील शेतकऱ्याला मुकले

0
65

रत्नागिरी : गेली ३० वर्षे शेती व्यवसायात नवनवीन प्रयाेग करत असतानाच भात उत्पादनात जागतिक विक्रमाशी बराेबरी करण्याचा मान रिळ (ता. रत्नागिरी) येथील मिलिंद दिनकर वैद्य यांनी मिळविला हाेता.

विक्रमी भात उत्पादनामुळे आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या मिलिंद वैद्य यांच्या अपघाती निधनानंतर कृषी क्षेत्र एका प्रयाेगशील शेतकऱ्याला मुकले आहे.

पदवीधर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेली ३० वर्षे मिलिंद वैद्य शेती व्यवसायात कार्यरत हाेते. या ३० वर्षांत दरदिवशी काहीतरी नवनवीन प्रयाेग ते करत हाेते. या प्रयाेगातच त्यांनी शेतात सगुणा वाणाचा प्रयाेग केला.

पारंपरिक शेती आणि सगुणा भातशेती यामध्ये फरक आहे. पारंपरिक पद्धतीत जमीन भाजणे, राेप टाकणे, राेप काढणे आणि पुन्हा लावणे अशी प्रक्रिया करावी लागते. याला कालावधी जास्त लागताे.

मात्र, सगुणा भातशेतीत १० ते १५ वर्षांत एकदाच नांगरणी करायची. शेतीसाठी आधी गादी वाफे करून घ्यायचे. पारंपरिक शेतीसाठी लागणाऱ्या कालावधीत सगुणा वाणाचे भाताची उंची वाढते, त्यामुळे त्याचा फायदा हाेताे. सगुणा पद्धतीच्या भात लागवडीनंतर मिलिंद वैद्य यांनी उत्पादनाचे उच्चांक माेडले हाेते.

एका हेक्टरमध्ये भाताचे जगातील सर्वाधिक उत्पादन चीनमध्ये १९.४० टन इतके घेतले जाते. या जागतिक विक्रमाशी बराेबरी करण्याचा विक्रम मिलिंद वैद्य यांनी केला हाेता.

एका हेक्टरमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक उत्पादन १९.२४ टन त्यांनी घेतले हाेते. यामुळे मिलिंद वैद्य यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली हाेती. हा प्रयाेग शेतकऱ्यांनी केला तर येथील संपूर्ण शेतकरी सधन हाेईल, असे मिलिंद वैद्य सांगायचे. आधुनिक शेतीची कास धरली तर शेतकरीही अटकेपार झेंडा लावू शकताे, हे मिलिंद वैद्य यांनी दाखवून दिले हाेते.

कृषीबराेबरच पूरक व्यवसायही

१० पैशाच्या बीपासून १००० रुपयांचा फायदा देणाऱ्या भाेपळ्यापासून अनेक किफायतशीर भाजीपाला त्यांच्याकडे तयार हाेताे. त्यांची उत्तम प्रकारे विक्रीही ते करत हाेते. कृषीच नव्हे तर त्यासाेबत पूरक व्यवसायही ते करत हाेते. दुग्धव्यवसायातून केवळ दुधाचा व्यवसाय न करता दही, तूप यांचीही ते विक्री करत हाेते. गुलकंद, नारळाच्या झाडापासून विविध वस्तूही ते तयार करत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here