प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : खासदार शरद पवार यांचे व्यावसायिक भागीदार कांतीलाल प्रेमलाल चोरडिया यांच्यासह बाबासाहेब गणेश देसाई, बाबासाहेब पांडुरंग जाधव, नितीन श्रीकांत चौगले आणि एस. बी. पाटील (सर्व रा.
कोल्हापूर यांच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात रविवारी (दि. २६) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. बनावट कागदपत्रांच्या आधारे शिवाजी पार्क येथील ६० कोटी रुपये किमतीची २० गुंठे जमीन खरेदी करून फसवणूक केल्याची फिर्याद जितेंद्र राचोजीराव जाधव (वय ६४, रा. मायाक्का चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगाव) यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी जितेंद्र जाधव यांचे आजोबा सुबराव राचोजीराव जाधव यांच्या मालकीची २० गुंठे जमीन कोल्हापुरातील शिवाजी पार्क येथे आहे.
या जमिनीची सर्व कागदपत्रे जाधव कुटुंबीयांकडे आहेत. बाबासाहेब देसाई यांना कोणतेही वटमुखत्यारपत्र दिले नसताना ते असल्याचे भासवून त्यांनी १९८८ मध्ये संबंधित मालमत्ता चोरडिया, चौगले आणि जाधव यांना विकली.
संबंधित मालमत्तेबाबतचा वाद न्यायप्रविष्ट असतानाही करवीरचे तत्कालीन सहदुय्यम निबंधक एस. बी. पाटील यांनी सरकारी वकिलांचा अभिप्राय घेऊन नोव्हेंबर २००६ मध्ये दस्त नोंदणी केली.
पाच महिन्यांपूर्वी माहिती अधिकारात माहिती मागवल्यानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याची माहिती फिर्यादी जाधव यांनी दिली. संशयितांमधील चोरडिया हे खासदार शरद पवार यांचे व्यावसायिक भागीदार आहेत.
आजोबा सुबराव जाधव यांनी कोणतेही वटमुखत्यारपत्र दिले नसतानाही संशयितांनी बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपली. तसेच ६० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख जितेंद्र जाधव यांनी फिर्यादीत केला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ अधिक तपास करीत आहेत. याबाबत कागदपत्रांची छाननी करून योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी दिली.