रत्नागिरी: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ३० नोव्हेंबर रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालय येथे नियोजित बैठकीत घेतला.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रशासनाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याबाबत माहिती घेतली. नियोजन कोणत्या पद्धतीने केले पाहिजे याबाबत प्रशासनाला मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचे उदघाटन करण्यात येणार आहे. तसेच महिला बचतगट सीआरपी यांना मोबाइल वाटप, अपंग लोकांना साहित्य वाटप, कामगारांना साहित्य वाटप, असे विविध कार्यक्रम करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण सामंत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रांताधिकारी जीवन देसाई, विकास सूर्यवंशी, नायब तहसीलदार गिड्डे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव उपस्थित होते.