नेत्र’दीपक’ पहाट: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार दिव्यांनी झळाळली कोल्हापूरची पंचगंगा

0
63

कोल्हापूर : रम्य पहाट, बोचरी थंडी, सुमधूर संगीत, फटाक्यांची आतषबाजी अशा उत्साही वातावरणात पंचगंगा नदी घाटावर सोमवारी पहाटे दीपोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त पंचगंगा नदीघाट परिसरात शिवमुद्रा प्रतिष्ठानतर्फे सोमवारी पहाटे ५१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले.

या उपक्रमाला कोल्हापूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

पहाटे साडेतीन वाजता प्रतिष्ठानतर्फे संदीप देसाई यांच्या हस्ते आरती करून दीपोत्सवाला सुरूवात झाली. रात्री बारा वाजल्यापासून नागरिकांनी गर्दी करायला सुरूवात केली होती.

येथे आलेल्या नागरिकांनीही एक दीप पंचगंगेसाठी लावला. आरतीनंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. विशेषत: तरुणाईचा उत्साह अधिक होता.

यंदाचे ४१ वे वर्ष आहे. दीपोत्सवाची तयारी रविवारी रात्रीपासूनच सुरू होती. लेसर शो आणि हजारो दिव्यांच्या प्रकाशात येथील मंदिरांचे सौंदर्यही आणखी खुलून दिसत होते.

पहाटेच्यावेळी या मंदिरांचे देखणे रूप अनेकांना पाहता आले. या सोहळ्यासाठी विकी कवाळे, अविनाश साळोखे, दीपक देसाई, अर्जुन आंबी, अवधूत कोळी, प्रवीण चौगले, विनायक हजारे आदींनी परिश्रम घेतले.

आकर्षक रांगोळ्या, भक्तीगीतांनी दीपोत्सवात रंगत

आकर्षक रांगोळ्यांमध्ये बेटी बचाओ, सेव्ह द गर्ल्स, रोटरी-रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूरतर्फे भ्रष्टाचाराला आळा घालूया, सुरूवात आपल्यापासून, अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती आदी रांगोळ्या पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

अनेकांनी याच्या छबी मोबाइलमध्ये उतरवल्या. तसेच महेश हिरेमठ प्रस्तुत अंतरंग वाद्यवृंदातर्फे दीपोत्सव पहाट म्हणून भावगीत, भक्तिगीते सादर करण्यात आली. भक्तीगीतांनी दीपोत्सवाची रंगत

मंदिरे उजळली

यानिमित्त नदीघाटांसह ब्रह्मपुरी, महादेव मंदिर, कृमकेश्वर मंदिर, रावणेश्वर, पिकनिक पॉईंट, परिसरातील दीपमाळांवर नागरिकांनी पहाटे तीन वाजल्यापासून दिवे प्रज्वलित करण्यास सुरूवात केली.

नदीपात्रात असलेल्या समाधी मंदिरावरही विविधरंगी लेझर किरणांचा प्रकाशझोत टाकण्यात आला होता. हा सोहळा नयनरम्य डोळ्याला सुखवणारा दिसत होता. या उत्सवाची सुरूवात दीपपूजनाने झाली. समाधी स्थळावरील महादेव मंदिरात श्री महाकालची पूजा विशेष लक्षवेधी ठरली.

दीपोत्सवात ‘लेझर शो’चा अडथळा

यंदाच्या दीपोत्सवात ५१ हजार दिव्यांनी घाट नैसर्गिकरीत्या उजळला हे दृश्य सर्वांच्याच डोळ्यांना सुखावणारे होते. त्यात ‘लेझर शो’चा अतिवापर केल्यामुळे या दीपोत्सवाची मजा उडाल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे तरी केळ तेलाचे आणि मेणाच्या पणत्यांचे दिवे लावावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here