गुजरातमधील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. वीज पडून 20 जणांचा मृत्यू झाला. एका अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून झालेल्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि सांगितलं की,स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे.
स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन्स सेंटर (SEOC) च्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या विविध भागांतून आतापर्यंत एकूण 20 पावसामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
राज्यात रविवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. दाहोद जिल्ह्यात चार, भरूचमध्ये तीन, तापीमध्ये दोन आणि अहमदाबाद, अमरेली, बनासकांठा, बोटाद, खेडा, मेहसाणा, पंचमहल, साबरकांठा, सूरत, सुरेंद्रनगर आणि देवभूमी द्वारका येथे प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला अशी माहिती एसईओ अधिकाऱ्याने दिली आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रविवारी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, गुजरातमधील विविध शहरांमध्ये खराब हवामान आणि वीज पडून अनेक लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झालं आहे.
या दुर्घटनेत अनेकांनी आपल्या प्रियजनांना गमावलं आहे. मी शोक व्यक्त करतो. स्थानिक प्रशासन मदतकार्य करत आहे, जखमी लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) सोमवारी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
SEOC च्या आकडेवारीनुसार, रविवारी गुजरातच्या 252 पैकी 234 तालुक्यांमध्ये पाऊस झाला, सुरत, सुरेंद्रनगर, खेडा, तापी, भरूच आणि अमरेली जिल्ह्यांमध्ये 16 तासांत 50-117 मिमी पावसाची नोंद झाली, त्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. राजकोटच्या काही भागात गारपीट झाली. पिकांचे नुकसानाबरोबरच सौराष्ट्र विभागातील मोरबी जिल्ह्यातील सिरॅमिक उद्योगावरही पावसाचा परिणाम झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.