‘पुणे-बंगळुरू महामार्गाच्या सहापदरीकरणात वाहतुकीबरोबर महापुराचाही विचार व्हावा’

0
64

प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील

कोल्हापूर : कोल्हापुरातून गेलेल्या पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, बास्केट ब्रीज व त्याचे पोहोच रस्ते करताना केवळ वाहतुकीचा विचार न करता शहरातील महापुराचा धोकाही लक्षात घ्यायला हवा.

त्यासाठी या सर्वांचेच बांधकाम व्हाया डक्ट पद्धतीने करा, अशी मागणी कोल्हापूर असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्सने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली. महामार्गावरील पुलांचे प्रस्तावित डिझाईन पुण्यातील ‘सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर’ यांच्याकडून तपासून घ्यावे, असेही या पत्रात सुचविले आहे.

पत्रात म्हटले आहे, पुणे-बंगळूरू महामार्गाचे सहापदरीकरण व त्यावरील पुलांच्या कामासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. मात्र, घाईगडबडीत निव्वळ रस्ते वाहतुकीसाठी पूल आणि पुलांचे पोहोच रस्त्यांचे बांधकाम न करता बदललेले पर्जन्यमान याचा विचार करून या पुलांच्या पोहोच रस्त्यांच्या अडथळ्यांमुळे निर्माण होणाऱ्या कोल्हापूर आणि शहर परिसरातील महापूर आपत्तीचाही विचार या पुलांचे डिझाईन करताना करणे आवश्यक आहे.

एकत्रित मॉडेलचा अभ्यास करा

कोल्हापूरमध्ये २०१९, २०२१ व २०२३ मध्ये आलेला पूर, पाटबंधारे विभागाकडील पंचगंगा व कृष्ण नदीच्या महापूर संदर्भातील उपलब्ध रेकॉर्डचा आधार घ्या. पूल अस्तित्वात नसल्यास व असल्यास, पूल आणि पोहोच रस्ते यामुळे निर्माण होणारी पूरपरिस्थिती, व्हाया डक्ट पद्धतीचा अवलंब केल्यास होणारा परिणाम याचे एकत्रित मॉडेल तयार करून त्यावर अभ्यास करा व नंतर निर्णय घ्या, अशी मागणी या पत्रात केली आहे.

पुलाचे हायड्रॉलिक डिझाईन तपासून घ्या

कोल्हापूर व सांगली येथील पुराची कारणे शोधणे व त्यावर उपाययोजना सुचविणे यासाठी नेमलेल्या वडनेरे समितीच्या अहवालातही अशा बांधकामांचे हायड्राॅलिक ऑडिट करावे अशी शिफारस केली आहे. त्यामुळे महामार्गावर उभारण्यात येणाऱ्या पुलांचे सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर या संस्थेकडून डिझाईन तपासून घ्यावे, तोपर्यंत संबंधित पुलाचे किंवा पोहोच रस्त्यांचे बांधकाम करू नये, अशी मागणी करण्यात आली.

पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण, बास्केट ब्रीज व त्याचे पोहोच रस्ते करताना केवळ वाहतुकीचा विचार न करता महापुराचा धोकाही लक्षात घ्या. त्यासाठी या सर्वांचेच बांधकाम व्हाया डक्ट पद्धतीने करा अशी मागणी राज्य शासन, खासदार व राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण संचालक यांच्याकडे केली आहे. मात्र, संबंधितांकडून समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. – अजय कोराणे, अध्यक्ष असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स, कोल्हापूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here