कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईला ‘जीवदान’ दिले, कोल्हापुरातील तरुणांनी 1500 लोकांना जेवू घालून ‘डोहाळेजेवण’ केले

0
55

कोल्हापूर: कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईला ‘जीवदान’ देवून जयसिंगपुरातील काही प्राणीप्रेमींनी तिचे संगोपन केले. इतकेच नाही तर 1500 लोकांना जेवू घालून ‘डोहाळेजेवण’ देखील केले.

प्राणीप्रेमी तरुणांनी केलेल्या या कामाचा सर्वांनी आदर्श घ्यावा असाच आहे. या डोहाळेजेवणांची सर्वत्र चर्चा सुरु असून तरुणांनी केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

गेल्या वर्षी एक गाय अशक्त झाली होती. यामुळे मालकाने आपले नुकसान होणार म्हणून तिला कत्तलखाण्यात द्यायचे ठरवले. पण याच वेळेस जयसिंगपूर येथील काही तरुण देवासारखे धावून गेले.

त्यांनी या गायीला ताब्यात घेऊन तिचे संगोपन केले. शाहू नगर समडोळे मळा येथील व्ही बॉईज चौक मंडळाच्या तरुणांनी ज्याला जसे जमेल तसे गायीचा सांभाळ केला. यामुळे गायीची तब्येत चांगली सुधारली.

दरम्यान ही गाय गाभण राहिल्याची आनंदाची बातमी सर्वांना कळली. मग तरुणांनी गायीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटात करायचे ठरवले. काल, बुधवारी मंडळाने चौकात मंडप घातला अन् राधा गायीला फुलांच्या माळांनी सजवून याठिकाणी आणण्यात आले.

मग सुवासिनी महिलांनी वाजत गाजत गारवा आणून प्रेमाने गायीला साडी, फळे देऊन ओटी ही भरली. आपल्या घरच्या कार्यक्रमासारखा प्रत्यकाचा उत्साह इथे दिसून येत होता.

त्यांनतर सायंकाळी सुमारे 1500 हून अधिक माणसांचे यावेळी गोडधोडाचे सुग्रास असे जेवण तयार करण्यात आले. विशेष म्हणजे गाईची ओटी भरण्यासाठी प्राणी प्रेमींना खास आमंत्रण यावेळी मंडळाने दिले होते.

राधा गायीचा हा अनोखा असा डोहाळ जेवणाचा मोठ्या थाटामाटात पार पडलेला कार्यक्रम खरेतर सगळ्यांना नवा आदर्श देणारा ठरला. गायीचा जीव वाचवून भूतदया दाखवून देणाऱ्या तरुणांचे आता भरभरून कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here