कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा बंद होण्याची शक्यता, प्रतिसाद कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे

0
73

कोल्हापूर : कोल्हापूरकरांना तिरूपती देवस्थानाविषयी असणारी आपुलकी, दोन देवस्थानांच्या माध्यमातून दोन शहरांमध्ये जोडल्या गेलेल्या याच आध्यात्मिक स्नेहातून साडेचार वर्षांपूर्वी सुरू झालेली कोल्हापूर-तिरूपती ही विमानसेवा इंडिगो कंपनी बंद करणार आहे.

या सेवेला प्रतिसाद कमी असल्याचे कारण देत कंपनीने हा निर्णय घेतला आहे. परंतु, या दोन धार्मिक क्षेत्रांना जोडण्यासाठी सुरू झालेली ही सेवा आहे. त्यावेळी शंभर टक्के प्रतिसादाची अट नव्हती.

साडेचार वर्षांपूर्वी कोल्हापूर-तिरूपती ही ७५ प्रवासी क्षमता असणारी विमानसेवा इंडिगो कंपनीकडून सुरू करण्यात आली. या विमानसेवेला सुरूवातीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

मात्र, आता प्रवाशांची संख्या कमी असल्याचे कारण देत कंपनीकडून येत्या १५ डिसेंबरपासून ही सेवा बंद करण्यात येत आहे. विमानतळावर कार्यरत कंपनीच्या व्यवस्थापनाला वरिष्ठ कार्यालयाने तसे कळविले आहे.

तिरूपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर असंख्य भाविक अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येतात. हाच धागा जोडत दोन शहरांमधील आध्यात्मिक बंध या सेवेने जोडले गेले होते.

मात्र, आता ही सेवा बंद केल्यास या दोन्ही मंदिरांचे दर्शन करू इच्छिणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार आहे. शिवाय, दोन्ही शहरांमधील आर्थिक उलाढालीवरही परिणाम होणार आहे.

सेवा द्यायची नसेल तर गाशा गुंडाळा

ही सेवा सुरू झाल्यापासून सव्वा लाखांच्या आसपास प्रवाशांनी कोल्हापूर-तिरूपती सेवेचा लाभ घेतला आहे. या सेवेला मिळणारा प्रतिसाद तसा चांगलाच आहे. पण कंपनीला शंभर टक्के प्रवाशांची अपेक्षा आहे.

ती मिळत नसल्यानेच सेवा खंडित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कंपनीला ही सेवा द्यायची नसेल तर त्यांनी येथील व्यवस्थापन काढून घेत दुसऱ्या विमान कंपनीला सेवा सुरू करण्याची संधी द्यावी, अशी मागणी होत आहे.

श्रेयवाद बाजूला ठेवा

एकीकडे कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण करून त्याला अधिक सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. इंदौर, शिर्डेी, नागपूर या मार्गांवर नव्याने सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न चालविले जात आहेत.

तर दुसरीकडे आहे त्या सेवाच बंद होत असल्याने या विमानतळाचे भवितव्य टांगणीला लागण्याची भीती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी श्रेयवाद बाजूला ठेवून याविरोधात आवाज उठविणे गरजेचे आहे.

अंबाबाई व तिरूपती बालाजी या दोन देवस्थानांमध्ये पारंपरिक आध्यात्मिक नाते आहे. या विमानसेवेने ते अधिक वृद्धिंगत झाले आहे. कोल्हापुरातून तिरूपतीला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही सेवा बंद होऊ देणार नाही. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू. – विकासराव माने, सदस्य, कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here