प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी सकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. सतीश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन (आयटक) आणि अप्पा पाटील, शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन यांचे हे मोर्चे निघाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर मोर्चेकरांनी ठिय्या मारला आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा महाराणी ताराराणी सभागृहामध्ये जनता दरबार सुरू असून यामध्ये जाऊन या दोन्ही मोर्चेकर्यांनी आपल्या मागण्यांची निवेदने दिली आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे ही वैधानिक असल्याने त्यांना वेतन द्यावे, सेविकांना दरमहा २६ हजार रुपये आणि मदतनिसांना २०००० रुपये मानधन करावे, दर सहा महिन्यानी मानधनात महागाई निर्देशांकानुसार वाढ करावी,
आहाराचा दर आठ रुपये ऐवजी १६ सोळा रुपये करावा अशा विविध मागण्या मोर्चेकर्यांनी केलेल्या आहेत. मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील अंगणवाड्यांचे काम ठप्प झाले आहे.