रस्त्यावर आपल्याला अनेकदा भिकारी भीक मागताना दिसतात. गुजरातमधील वलसाडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भिकारी असल्याचे सांगणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला रविवारी वलसाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेव्हा त्याच्याकडे 1.14 लाख रुपयांची रोकड होती.
मात्र काही वेळाने व्यक्तीचा मृत्यू झाला. हैराण करणारी बाब म्हणजे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूचे कारण भूक असल्याचं सांगण्यात आलं आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अधिकारी या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. वलसाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एका दुकानदाराने आपत्कालीन क्रमांक 108 डायल केला. गांधी वाचनालयाजवळ रस्त्याच्या कडेला गेल्या काही दिवसांपासून एक भिकारी पडून होता. दुकानदाराने वृद्धाची तब्येत खालावली असल्याचं सांगितलं.
भावेश पटेल आणि त्यांची टीम यानंतर घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी वृद्धाशी चर्चा केली. प्राथमिक तपासानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. भावेश पटेल यांनी तो माणूस गुजराती बोलत होता. तो वलसाडच्या धोबी तलाव परिसरात राहतो असं सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून त्याची कोणतीही हालचाल होत नसल्याचं दुकानदाराने म्हटलं आहे.
भावेश पटेल पुढे म्हणाले की, “आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हा 1.14 लाख रुपयांची रोकड सापडली. 500 रुपयांच्या 38 नोटा, 200 रुपयांच्या 83 नोटा, 100 रुपयांच्या 537 नोटा आणि 20 आणि 10 रुपयांच्या इतर नोटांचा त्यामध्ये समावेश होता. या सर्व नोटा गोळा करून त्याने प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून स्वेटरच्या खिशात ठेवल्या होत्या. वैद्यकीय अधिकार्यांसमोर आम्ही रोख रक्कम वलसाड शहर पोलिसांकडे सुपूर्द केली.”
वलसाड सिव्हिल हॉस्पिटलचे डॉ. कृष्णा पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाला आमच्याकडे आणले असता त्याने चहा मागितला. आम्हाला वाटलं की त्याला भूक लागली आहे आणि त्याच्या रक्तातील साखरेची पातळी कमी झाली आहे. आम्ही सलाईन लावून उपचार सुरू केले. तासाभरानंतर त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून त्याने काहीही खाल्ले नव्हते. त्या भिकाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही.