Kolhapur: नव्या वर्षात संभाजीनगर एसटी स्टँड येणार सेवेत – सतेज पाटील

0
106

कोल्हापूर : उपनगरातील प्रवाशांच्या सोयीकरिता आधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेले संभाजीनगर बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे आले असून नव्या वर्षात ते प्रवाशांच्या सेवेत सज्ज होईल. असा विश्वास माजी परिवहन राज्यमंत्री आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला.

बुधवारी आमदार पाटील यांनी संभाजीनगर बसस्थानकास भेट देऊन कामाची पाहणी केली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार ऋतुराज पाटील, विभाग नियंत्रक अनघा बारटक्के, संभाजीनगर आगाराचे प्रमुख शिवराज जाधव, विभाग अभियंता मनोज लिंग्रस उपस्थित होते.

पाटील म्हणाले, मध्यवर्ती बसस्थानकावरील प्रवाशांचा भार कमी व्हावा. उपगनगरातील प्रवाशांना राधानगरी, भुदरगड, गगनबावडा आणि कोकण, पुणे, मुंबई आदी ठिकाणी जाण्यास सुलभ व्हावे.

या उद्देशाने संभाजीनगर बस स्थानकाचे रुपडे पालटण्यासाठी ९ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करून घेतला. संभाजीनगर स्थानकाचे इमारतीसह अंतर्गत काम पूर्णत्वाकडे आले आहे. केवळ किरकोळ कामे शिल्लक आहेत.

त्यानंतर नव्या वर्षात अर्थात जानेवारी महिन्यात बस स्थानकातून या मार्गावर एस.टी. बस सोडल्या जातील. सध्या या स्थानकातून टचिंग पाॅइंट म्हणजेच येथून मध्यवर्ती बस स्थानकात प्रवाशांना नेण्याची सोय केली आहे.

कोल्हापूरकरांची भावना विचारात घेता बसस्थानकाचे नामकरण छत्रपती संभाजीनगर बसस्थानक करण्यासाठी मागणीचे पत्र एस.टी. महामंडळास देऊन त्याचा पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी माजी उपमहापौर विक्रम जरग, संजय मोहिते, माजी नगरसेवक सचिन चव्हाण, दुर्वास कदम, शारंगधर देशमुख, सुयोग मगदूम आदी उपस्थित होते.

नामकरणाचा प्रस्ताव

एसटीच्या कोल्हापूर विभागात शहरातील मध्यवर्ती बसस्थानकानंतर संभाजीनगर बसस्थानकाचा समावेश आहे. या स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी महामंडळाच्या अध्यक्ष किंवा कार्यकारी संचालक आणि संचालक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. ती मिळाल्यानंतर नावातही बदल होणार आहे. यासाठी माजी परिवहन राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी महामंडळास पत्र देणार आहे, तर कार्यालयीन प्रस्ताव विभाग नियंत्रक अनघा बारटक्के देणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here