कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हणमंतवाडी येथे कंपाउंडर हणमंत शिवाजी दलवाई (रा. हणमंतवाडी) याने राहत्या घरातच दवाखाना थाटला होता. याबद्दल तक्रारी येताच करवीर पंचायत समितीच्या बोगस डॉक्टर चौकशी समितीने छापा टाकून बोगस डॉक्टरवर कारवाई केली.
हणमंतवाडी येथील हणमंत दलवाई हा कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून काम करीत होता. गेल्या सहा महिन्यांपासून त्याने गावात राहत्या घरातच दवाखाना थाटला होता. सर्दी, खोकला, अंगदुखी, अशक्तपणा अशा आजारांवर तो रुग्णांना इंजेक्शन आणि गोळ्या द्यायचा. तसेच रुग्णांना सलाइनही लावले जात होते.
याबाबत करवीर पंचायत समितीच्या बोगस डॉक्टर चौकशी समितीकडे तक्रार आली होती. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी करवीर पोलिसांच्या मदतीने दलवाई याच्या घरातील दवाखान्यात छापा टाकून तपासणी केली.