शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची कोल्हापूरमधील कारकीर्द ठरली होती वादग्रस्त, कारवाईनंतर रंगली चर्चा

0
103

कोल्हापूर : किरण लोहार हे प्राथमिक शिक्षक होते. शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील हा युवक डी.एड. होऊन करवीर तालुक्यात प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीस लागला; परंतु त्याचा स्वभाव महत्त्वाकांक्षी.

त्यामुळे हा गडी स्वस्थ बसला नाही. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन तो रत्नागिरीला माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाला. बुधवारी सोलापुरात झालेल्या त्यांच्यावरील कारवाईनंतर त्यांच्या कोल्हापूरच्या कारकिर्दीचीही चर्चा सुरू झाली आहे.

किरण लोहार २४ ऑगस्ट २०१७ रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेत रुजू झाल्यानंतर वास्तविक पदाधिकाऱ्यांनाही वाटले की आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र आहे. काही प्रश्न मार्गी लागतील.

प्रश्न मार्गी लागले; परंतु ते लोहार यांच्या प्राधान्यक्रमातील. अनेक वर्षे न झालेली कामे जशी होऊ लागली तसतशी लोहार यांच्याबद्दलच्या सुरस कथा बाहेर येऊ लागल्या.

मूळ कोकणातील; परंतु मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या मंत्र्यांच्या आशीर्वादामुळे ते सलग चार वर्षे कोल्हापुरातच होते. अशात प्रभारी शिक्षण उपसंचालक म्हणूनही त्यांना काम करण्याची संधी मिळाली.

संधीचे ‘सोने’ करण्याचा स्वभाव

लोहार यांचा स्वभावच संधीचं सोनं करण्याचा होता. त्यामुळे जेवढे अवघड प्रकरण त्यांच्यासमोर जायचे त्यातून ते दोघांच्या ‘कल्याणाचा’ मार्ग काढायचे. अगदी कोणाला उच्च न्यायालयात जाण्यासाठी सांगण्यापासून वकील कोण द्यायचा याचेदेखील ते मार्गदर्शन करायचे. यातूनच त्यांनी दिलेल्या शेकडो मान्यतांचा हिशेब लावला जाऊ लागला.

पीएचडीही बनावट

लोहार यांना विविध सार्वजनिक संस्थांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. यामध्ये टोंगा विद्यापीठाकडून त्यांना डॉक्टरेटही प्रदान करण्यात आली; परंतु लोहार यांना ही पदवी दिल्यानंतर कोल्हापूरच्या एका सजग नागरिकाने या विद्यापीठाची माहिती घेतली असता ते विद्यापीठही बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here