जुन्या पेन्शनसाठी येत्या सोमवारी नागपूर अधिवेशनावर मोर्चा, सांगली जिल्ह्यातून हजारो शिक्षक सहभागी होणार

0
78

मिरज : राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामे लावू नका, जुनी पेन्शन योजना लागू करावी, यासह इतर मागण्यांसाठी सोमवार, दि. ११ रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर शिक्षकांचा आक्रोश मोर्चा निघणार आहे.

या मोर्चात जिल्ह्यातून जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे यांनी केले.

नागपूर येथील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक समितीच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक मिरज येथे पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील, नेते किरण गायकवाड, हरिभाऊ गावडे, सदाशिव पाटील, आदी उपस्थित होते.

उदय शिंदे म्हणाले, राज्यात प्राथमिक शिक्षकांच्या अनेक मागण्या दीर्घकाळापासून प्रलंबित आहेत. कमी पटसंख्येच्या नावाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद अथवा समायोजित केले जात आहे.

हा निर्णय चुकीचा आहे. शाळा समूह योजना रद्द करावी, दत्तक शाळा योजना रद्द करावी. रिक्त जागा त्वरित भराव्यात, कंत्राटी शिक्षक स्वयंसेवक पद्धत बंद करावी, यासह इतर मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे.

राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील यांनी शिक्षक समिती ही राज्यातील सर्वांत बलाढ्य संघटना असून विद्यार्थी, शिक्षण, शिक्षक आणि समाज या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मोर्चाला उपस्थित राहावे, असे आवाहन केले.

जिल्हाध्यक्ष माणिकराव पाटील म्हणाले, शिक्षकांना अतिरिक्त काम देण्यात येते. त्याचा ताण शिक्षकांवर येतो. त्यामुळे शिक्षकांचा मूळ उद्देशच बाजूला राहत आहे. हे शासनाने बंद करावे.

या बैठकीला शिवाजी पवार, अण्णासाहेब जाधव, सतीश पाटील, शिवाजी पवार, यु. टी. जाधव, सतीश पाटील, सुनील गुरव, रमेश पाटील, नवनाथ पोळ, विकास चौगुले, काका कदम, आदी उपस्थित होते.

जुनी पेन्शनच्या पदाधिकाऱ्यांचा समितीमध्ये प्रवेश..

तासगाव तालुका जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष महादेव जंगम, जिल्हा सरचिटणीस राहुल कोळी, संघटक मुरगेश पाटील यांच्यासह शिक्षकांनी शिक्षक समितीमध्ये प्रवेश केला. समितीचे राज्यनेते उदय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here