कोल्हापूर : कॉलेजमधील तीन अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांना मद्य पाजून लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने दोन आरोपींना जादा सहजिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. तिडके यांनी दोषी ठरवले.
गुरुवारी (दि. १०) दोन्ही आरोपींना पाच वर्ष सक्तमजुरी आणि साडेआठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. २ नोव्हेंबर २०१८ मध्ये आरोपींनी कोल्हापुरातून मुलींचे अपहरण करून इस्लामपूरमध्ये (ता. वाळवा, जि. सांगली) त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते.
हर्षल आनंदा देसाई (वय २४, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) आणि प्रमोद हणमंत शिंदे (वय २४, रा. गांधीनगर, ता. करवीर) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन असून, त्याच्यावर बालहक्क न्यायालयात खटला सुरू आहे.
सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुली आणि तिन्ही आरोपी कोल्हापुरात एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. २ नोव्हेंबर २०१८ रोजी आरोपींनी या मुलींना महावीर गार्डन येथे बोलवून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने त्यांना इस्लामपूरमधील भाड्याच्या खोलीत घेऊन गेले. तिथे मुलींना मद्यप्राशन करायला भाग पाडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले.