अल्पवयीन मुलीचा पाठलाग, आरोपीस दोन वर्षांचा कारावास

0
101

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा सिध्द झाल्याने एका आरोपीस दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.पी.कुळकर्णी यांनी हा महत्वपूर्ण निकाल शुक्रवारी दिला.

पिडीत अल्पवयीन मुलगी ही ११ सप्टेंबर २०२१ रोजी शिकवणीसाठी जात होती. त्यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून वाईट उद्देशाने तिची ओढणी ओढून विनयभंग केला.

तसेच लग्नाची गळ घालून अल्पवयीन मुलीच्या भावास मारून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर पिडीतेने १४ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपी विरोधात शिवाजी नगर पोलिसांत तक्रार केली. या तक्रारीवरून पोलीसांनी आरोपिविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन एपीआय राहुल जगदाळे यांनी केला व तपासाअंती दोषारोपत्र सादर केले. आरोप सिध्द करण्याच्या अनुषंगाने न्यायालयात सरकार पक्षातर्फे ६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी फिर्यादी, पिडिता व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. आरोपीविरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने न्यायमूर्ती कुळकणी यांनी आरोपी अक्षय गणेश इंगळे यांस भादंविच्या कलम ३५४, ३५४ डी व कलम ५०६ अंतर्गत शिक्षा सुनावली.

यामध्ये भादंविच्या कलम ३५४ मध्ये दोन वर्षाचा सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, तो न भरल्यास दोन महिने शिक्षा, कलम ३५४ डी मध्ये १ वर्षाचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, तो न भरल्यास १ महिन्याचा सश्रम कारावास तसेच कलम ५०६ नुसार दोन वर्षाचा सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याचा सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता रजनी बावस्कार (भालेराव ) यांनी काम पाहिले. तसेच अॅड. संजय बडगुजर यांनी सरकार पक्षास सहकार्य केले. कोर्ट पैरवी म्हणून ठाकुर यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here