कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेलं कोल्हापूर जिल्ह्यातील एक गाव सध्या मधाचे गाव म्हणून ओळखले जात आहे. या गावातील ग्रामस्थ मधाचे उत्पादन घेऊन वर्षाकाठी लाखो रुपये कमावित आहेत.
भुदरगड तालुक्यातील पाटगाव हे निसर्गरम्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल गाव. पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या गावात ही मधमाशा पालन उद्योग केला जातो. वर्षभरात साधारण पणे ८ ते १० टन मधाचे उत्पादन घेतले जाते.
याच ठिकाणचे मधपाळ धर्माजी कांबळे हे आज पूर्णवेळ मधाचे उत्पादन घेत असून त्यांचे वार्षिक नफा तीन ते चार लाख इतका कमावतात. धर्माजी पूर्वी गवंडी काम करत होते त्यासोबत ते मधमाशी पालन करून मधाचे उत्पादन घेत असत.
खादी ग्रामोद्योग यांच्या मार्फत त्यांना मध उत्पादनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. गेल्या दोन वर्षांपासून पूर्णवेळ मधाचे उत्पादन ते घेत आहेत. या व्यवसायातून वर्षाकाठी सुमारे 450 ते 500 किलो मधाची निर्मिती धर्माजी करतात. निसर्गसंपन्न परिसर असल्याने शुद्ध आणि नैसर्गिक मधाचे उत्पादन धर्माजी घेत असून या मधाला राज्यासह देशात ही मागणी वाढली आहे.
धर्माजी यांच्याप्रमाणे पाटगाव येथील अनेक शेतकरी, ग्रामस्थ मधाचे उत्पादन घेऊन चांगला नफा ही मिळवतात अन् बाजारात या मधाला मागणी ही अधिक आहे. मधाचे गाव म्हणून ओळख असणाऱ्या पाटगावने अनेकांना मध निर्मितीतून वेगळी ओळख दिली आहे. एकेकाळी गवंडी काम करणारे धर्माजी शुद्ध मधाचे उत्पादन घेऊन चांगला नफा कमवू लागले आहेत. त्यामुळे मध निर्मिती ही नव्या व्यवसायाची संधी ग्रामीण भागातील युवकासाठी उपलब्ध झाली आहे.
मध निर्मिती ते वसाहत निर्मिती
धर्माजी स्वतः मधाचे उत्पादन घेत असून यातून त्यांना चांगला नफा ही मिळत आहे. मधपाळ म्हणून काम करणाऱ्यांना ते मधुमक्षिका पालन कसे करावे याचे प्रशिक्षण ही देतात. तसेच मधमाश्यांच्या वसाहती निर्माण करून त्यांनी आजवर 100 हून अधिक वसाहतींची विक्री केली आहे.
समाजात मधपाळ म्हणून मान सन्मान मिळाला
एकेकाळी गवंडी काम करणारे धर्माजी आज मध निर्मितीत अग्रेसर ठरले आहेत. नव्या व्यवसायाने त्यांना एक नवी ओळख मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. मध निर्मितीतून निसर्ग संवर्धनासाठी मोलाचा वाटा उचलण्याची संधी मिळते या कार्याचा त्यांना अभिमान वाटतो. – धर्माजी कांबळे, मधपाळ, अंतूर्ली