Kolhapur: विविध मागण्यांसाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले

0
150

कोल्हापूर : चार एकर स्लॅबची मर्यादा बदलून आठ एकर करा, सातबारावरील चिकोत्रा प्रकल्पासाठी राखीव जमीनीचा शेरा रद्द करा, राष्ट्रीय महामार्गामधील भूसंपदानत बाधित शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तसेच मालमत्तेचे फेरसर्वेक्षण करा यासह पेरण्या न झालेल्या ठिकाणी भरपाई द्या,

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आदी मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे चारशेहून अधिक शेतकरी गुरुवारी काेल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

विविध मागण्यांचे फलक हातात घेउन ताराबाई पार्क येथून चालत निघालेल्या करवीर, कागल, चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील चारशेहून अधिक शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडवण्यात आले.

जोरदार घोषणाबाजी करत तेथेच त्यांनी ठिय्या मांडला. यावेळी किसान संघाचे प्रांत सदस्य आर. डी. चौगले, जिल्हाध्यक्ष ॲड. यशवंत खानविलकर, उपाध्यक्ष सिध्दार्थ शिंदे यांनी भाषणे केली.

या मोर्चात कागल तालुक्यातील धनाजी खराडे, जावेद देसाई, आर. डी. पाटील, प्रकाश पाटील, अमित लुगडे, चंद्रकांत तहसिलदार, पांडू पानसरे, करवीर तालुक्यातील राजेश पाटील, देव पाटील, लक्ष्मण पाटील, सरदार निरुखे, अभिजित पाटील, तानाजी पाटील, मधुकर पाटील, सुनील पाटील, बाजीराव पाटील, तानाजी चौगुले येथील शेतकरी सहभागी झाले होते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि करवीरचे प्रांताधिकारी हरिष धार्मिक यांनी निवेदन स्विकारले.

फलकाद्वारे वेधले लक्ष

प्रस्तावित एनएच १६६ महामार्गामधील भूसंपादनात मौजे भुये, भुयेवाडी, किणी येथील शेतकऱ्यांच्या बाधित पाईपलाईनचा तसेच नुकसान होत असलेल्या घरे, झाडे, विहिरींचे फेरसर्वेक्षण करावे,मौजे आलाबाद, गलगले येथील कागल तालुक्यातील चिकोत्रा प्रकल्पांतर्गत अन्यायी ठरलेली चार एकर स्लॅबची मर्यादा तातडीने बदलून ती पुन्हा ८ एकर करावी, चिकोत्रासाठी राखीव जमीन अशी सातबारावरील शेरा रद्द करावी अशा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक प्रश्नांकडेही शेतकऱ्यांनी फलकाद्वारे लक्ष वेधले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here