प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : लाचखोर शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार (वय ५०, रा. पाचगाव, ता. करवीर) याच्या पाचगाव येथील घराची झडती घेण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर आणि कोल्हापूरच्या पथकाने बुधवारी (दि.
६) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईत लोहार याच्या घरातून चार लाखांची रोकड आणि मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली. यांच्या अन्य मालमत्तांवरही जप्तीची कारवाई होणार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले.
लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहार याची चौकशी सुरू असून, त्याच्याकडे पाच कोटी ८६ लाखांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार सोलापुरात त्याच्यासह पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लोहार याच्या पाचगावातील घरावर छापा टाकून झडती घेतली. या कारवाईत चार लाखांची रोकड पथकाच्या हाती लागली.
तसेच, चार कार मिळाल्या. यातील दोन कार लोहार याच्या नावावर आहेत, तर दोन कार अन्य नातेवाइकांच्या नावावर आहेत. मुंबईतील प्लॉट, पुण्यातील फ्लॅट याचीही कागदपत्रे मिळाल्याची माहिती उपअधीक्षक नाळे यांनी दिली. लोहार याने त्याच्या काही नातेवाइकांच्या नावे मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास सुरू असून, गैरमार्गाने मिळवलेली सर्व मालमत्ता जप्त केली जाईल, असे उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले.
पत्नी, मुलगाही पापाचे भागीदार
लोहार याची पत्नी शिक्षिका आहे, तर मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. गैरमार्गाने मिळणारा पैसा घरात येत असल्याचे समजल्यानंतरही माय-लेकाने लोहार यांना लाच घेण्यापासून परावृत्त केले नाही. त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल झाल्याचे उपअधीक्षक नाळे यांनी सांगितले. एकाच्या पापाची शिक्षा संपूर्ण कुटुंबाला भोगावी लागत आहे.