कोल्हापूर : आपल्या विविध मागण्यांसाठी चार डिसेंबर पासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. दरम्यानच आज, शुक्रवारी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी दुपारी सव्वा बारा वाजता मुख्य बसस्थानका नजीक दाभोळकर चौकामध्ये रास्ता रोको केला.
यामुळे वाहतुकीची कोंडी झाली.
‘मानधन नको वेतन हवे’, मानधन आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, भाजीत भाजी अंबाडी सरकार करते लबाडी, पाच रुपयाचा कडीपत्ता सरकार झालेले बेपत्ता अशा घोषणांनी यावेळी परिसर दणाणून गेला. सतीश कांबळे आणि रघुनाथ कांबळे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यानंतर करवीर भगिनी मंडळाच्या परिसरात सभा झाली.
१५ डिसेंबरला नागपूर अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने सहभागी होण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याच पद्धतीने अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्यावतीने ही कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरूच आहे.