कोल्हापूर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांची स्टेट ट्रान्सपोर्ट को- ऑप बँकेत काहीही संबंध नसताना गुणरत्न सदावर्ते यांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपामुळे त्यांच्या नेतृत्वाविरोधात १२ ते १३ संचालकांनी बंड केले आहे.
त्यांना सदावर्तेकडून धमक्या आणि चारचाकी वाहनांची अमिषे दाखवली जात आहेत.
सदावर्तेे यांनी आपले मेव्हणे सौरभ पाटील यांची बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियमबाह्य निवड केली आहे. ३८ कर्मचाऱ्यांची चुकीच्या पध्दतीने निवड केली आहे.
अशा पध्दतीने बँकेच्या हिताविरोधातील ठराव रद्द करण्यासाठी बंडखोर संचालक यापुढील काळात सक्रिय असतील, अशी माहिती बंडखोर संचालकांचे प्रवक्ते व एस. टी कष्टकरी जनसंघाचे उपाध्यक्ष संतोष शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
शिंदे म्हणाले, सदावर्ते बँकेत कोणत्याही पदावर नाहीत. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील या एसटी कष्टकरी जनसंघाच्या अध्यक्ष आहेत. जन संघांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवलेल्या पॅनेलची सत्ता बँकेत आली. म्हणून सदावर्ते बँकेच्या कारभारात लुडबूड करीत आहेत. त्यांच्या चुकीच्या हस्तक्षेपामुळे आणि जातीच व्देषाच्या वक्तव्यामुळे ४८० कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढून घेतल्या. परिणामी बँकेचा सीडी रेशो बिघडला.
बँक अडचणीत आली आहे. म्हणून बारा ते १३ संचालकांनी त्यांचे नेतृत्व झुगारले. बँकेची स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी त्यांनी बंड केले आहे. दरम्यान, बँकेचे पदसिध्द अध्यक्ष आणि उपाध्यक्ष एसटीचे वरिष्ठ अधिकारी आहेत. यामुळे बारा संचालकांकडून अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलाचा विषय येणार नाही. पण बँकेच्या पुढील कारभारात बंड केलेले १२ संचालक चुकीचे ठराव रद्द करतील.