प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : अमृत भारत योजनेतून मंजूर झालेल्या निधीतून कोल्हापूररेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करून त्याचा तोंडवळा बदलता येणे शक्य आहे. अ वर्गात असल्यामुळे कोल्हापूर हे मॉडेल रेल्वे स्थानक म्हणून गणले जाते.
कोल्हापूर-मिरज-पुणे मार्गावरील दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाला गती मिळाली आहे. परंतु सुविधा नावालाच आहेत. त्या पूर्ववत सुरु होण्याची गरज आहे.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस हे कोल्हापूरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. इमारतही १३७ वर्षापूर्वीची हेरिटेज वास्तू आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावरून या रेल्वे स्थानकाचे नाव दिले गेले आहे.
भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाद्वारे या स्थानकाचे नियंत्रण केले जाते. या स्थानकावरुन सुमारे ४० लाख प्रवासी प्रवास करतात. शिवाय वर्षाला ५० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते.
२०२० मध्ये प्लॅटफॉर्म विस्तारीकरण करण्यात आले. कोल्हापूर ते वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम लवकरच सुरु होणार आहे. मिरज-पुणे रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण झाल्यास गाड्यांची संख्या वाढणार आहे.
कोल्हापुरातून सध्या मुंबई, पुणे, नागपूर, तिरुपती, सोलापूर, दिल्ली, अहमदाबाद, धनबाद अशा शहरांकडे किमान १० गाड्या सुटतात. मिरज-कुर्डुवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वेप्रवास शक्य झाला आहे.
मॉडेल रेल्वेस्थानकामुळे सध्या कोल्हापूरच्या स्थानकावर स्वच्छता मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली जाते. भाजी मंडईच्या बाजूला सरकता जिना आहे, परंतु त्यांचा वापर प्रवाशांसाठी होत नाही, जेम्स स्टोनकडून रेल्वे प्लॅटफार्मवर येताना प्रवाशांसाठी त्या बाजूलाही तिकीट काउंटर आहे, पण तेही बंद आहे.
या सुविधांसह कोल्हापूर रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण करणे शक्य आहे. सध्या कोल्हापूर रेल्वेस्थानकावर एक, दोन, तीन आणि चार असे प्लॅटफार्म आहेत. यावरून एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्या सोडल्या जातात. यातील तीन लाइन्स रेल्वेची दुरूस्ती, स्वच्छतेसाठी वापरली जाते. आता या स्थानकावर ८ गाड्या एकाचवेळी थांबण्याची क्षमता आहे.
बेळगाव, पंढरपूर, कुर्डूवाडी पॅसेंजरची सोय होईल
मिरज ते पंढरपूर विद्युतीकरण झाले पण या मार्गावर गाड्या सोडल्या जात नाहीत. तिथे नव्या गाड्या सोडणे शक्य आहे. बेळगवा, कुर्डूवाडी, पंढरपूर या मार्गावर पॅसेंजर गाड्यां सुरु केल्यास प्रवाशांची सोय होउ शकते.