kolhapur Politics: ‘राधानगरी’त ‘के.पी’ची काँग्रेसला साथ? नव्या समीकरणाचे संकेत

0
98

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार के. पी. पाटील यांनी भविष्यात काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या सोबत राहण्याची भूमिका जाहीर करून ‘राधानगरी’चे महाविकास आघाडीचे उमेदवार ‘आपणच असू, असे संकेत दिले असले तरी यामध्ये सतेज पाटील यांच्या बरोबरच आमदार पी. एन. पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.

या माध्यमातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांचेही प्रयत्न सुरू झाले आहेत. एकूणच, या समीकरणामुळे आमदार प्रकाश आबिटकर यांची डोकेदुखी वाढणार हे मात्र, निश्चित आहे.

आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात काँग्रेस मजबुतीचे मिशन हातात घेतले असून दिवसेंदिवस ते आपली पकड घट्ट करत आहेत. त्यांच्या या भूमिकेचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकीत निश्चित होणार आहे.

‘बिद्री’ कारखान्यात घेतलेली आक्रमक भूमिका त्यानंतर के. पी. पाटील यांनी त्यांच्या सोबत राहण्याचा घेतलेला निर्णय, या गोष्टीमुळे जिल्ह्याच्या राजकारणावरील त्यांची पकड घट्ट होऊ लागली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आमदारांची संख्या वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असून त्यादृष्टीने ‘के. पीं’ची भूमिका पूरक मानली जात आहे.

राहुल देसाई यांचीही ‘सतेज’ यांच्याशी जवळीक

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी भाजप नेतृत्वाला अंगावर घेत ‘बिद्री’ला भूमिका घेतली. महायुती तर्फे येथे प्रकाश आबिटकर हे विधानसभेचे उमेदवार राहणार आहेत. देसाई यांची राजकीय इच्छा लपून राहिलेली नाही.

‘बिद्री’ निवडणुकीच्या निमित्ताने ते सतेज पाटील यांच्या जवळ आले असून पूर्वाश्रमीचे ते काँग्रेसचेच असल्याने दोन नेत्यांनी जवळकीला तो धागाही महत्त्वाचा ठरू शकतो.

‘के. पीं’च्या भूमिकेला हसन मुश्रीफ यांची मूक समंती

पालकमंत्री हसन मुश्रीफ व के. पी. पाटील यांची मैत्री घट्ट आहे. दोघांनीही एकमेकांना राजकीय जीवनात खूप मदत केली आहे. महायुतीच्या त्रांगड्यांमुळे त्यांना भविष्यातील राजकारणात त्यांना न्याय देणे कठीण होणार आहे. ‘के. पी.’ यांनी सतेज पाटील यांच्यासोबत काम करण्याची घेतलेली भूमिकेला मंत्री मुश्रीफ यांची मूक समंती असणार हे निश्चित आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे काय होणार..

मूळात राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात पुरती वाताहात झाली आहे. चार तालुक्यांचा पक्ष म्हणून विरोधक हिणवतात. ए. वाय. पाटील हे पक्षापासून दूर जाण्याची शक्यता आहे. त्यात ‘के. पीं’नी हातात ‘हात’ घेतला तर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे काय? असा प्रश्न निर्माण होणार आहे.

काँग्रेसची उमेदवारी सुरक्षित कशी?

  • भोगावती काठावर आमदार पी. एन. पाटील यांचा मजबूत गट आहे.
  • दूधगंगा काठावर राजेंद्र माेरे यांच्यामुळे आमदार सतेज पाटील यांची ताकद आहे.
  • भुदरगडमध्ये माजी आमदार दिनकरराव जाधव, सचिन घोरपडे यासह मौनी विद्यापीठाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे
  • आजरात अभिषेक शिंपी यांची ताकद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here