प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्यातर्फे दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालयामध्ये डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रवर अधीक्षक डाकघर ए.व्हि. इंगळे प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
कोल्हापूर डाकघर विभागाशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचं निवारण ६ आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळालं नसेल अशा तक्रारीची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल वस्तु, मनीऑर्डर, बचत खाते व प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी यामध्ये विचारात घेतल्या जाणार आहेत. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव, हुद्दा इत्यादी नमूद करण्यात यावे.
संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार ए.व्हि. इंगळे, प्रवर अधीक्षक डाकघर, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर ४१६००३ यांच्या नांवे दोन प्रती सह दि. १८ डिसेंबर २०२३ पर्यंत अथवा त्यापुर्वी पोहोचेल अशा रितीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार नाही, अशी माहिती ए व्ही इंगळे यांनी पत्रकाव्दारे केली आहे.