कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची काँग्रेसला तब्बल २५ वर्षांनंतर संधी आली आहे.

0
101

कोल्हापूर : बंडामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस कमकुवत झाल्याने लोकसभेसाठी काँग्रेसला संधी आणि त्या पक्षाची जबाबदारीही आता वाढली आहे. कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची काँग्रेसला तब्बल २५ वर्षांनंतर संधी आली आहे.

फक्त या पक्षाकडे सद्य:स्थितीत ही निवडणूक लढवायची कुणी, हाच प्रश्न आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आजपासून दोन दिवस दोन्ही मतदारसंघांची तयारीसाठी बैठक होत आहे. या बैठकीत कोल्हापूर मतदारसंघावर पक्ष जरूर दावा सांगेल; परंतु उमेदवार कोण, हा गुंता सोडविल्याशिवाय लढत सोपी नाही. शिवसेनेतील आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर काँग्रेसबद्दल जनमानसात पुन्हा सहानुभूती तयार होताना दिसत आहे. परंतु ती मतपेटीपर्यंत नेण्यासाठी तगडा उमेदवार व नेत्यांची एकी महत्त्वाची आहे.

आमदार सतेज पाटील आणि पी. एन. पाटील यांना आमदारकी सोडायची नाही.एक झेंडा खांद्यावर घेऊन आयुष्यभर वाटचाल ही पी. एन. यांची मोठी जमेची बाजू आहे. त्यांची उमेदवारी ही विजयाचे नाणे आहे; परंतु ते लोकसभा अंगाला लावून घ्यायला तयार नाहीत. अशा स्थितीत पक्षाकडे भक्कम पर्याय नाही. पक्षाकडे आताच्या घडीला बाजीराव खाडे, चेतन नरके यांनी उमेदवारी मागितली आहे.

करवीर विधानसभा मतदारसंघातील राजकारणातून पी. एन. यांना नरके हवे आहेत. परंतु सतेज पाटील यांनी अजून त्यांना ग्रीन सिग्नल दिलेला नाही. खाडे पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आहेत; परंतु लोकसभेसाठी तेवढीच पात्रता पुरेशी ठरत नाही. आमदार सतेज पाटील यांनी राधानगरी, भुदरगड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यांतही संघटनात्मक बांधणी केली आहे. अशा स्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस हवा निर्माण करू शकते.

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी (पवार गट) कमकुवत झाला. गेल्या निवडणुकीत दोन्ही जागा भाजप-शिवसेनेने जिंकल्या होत्या. महाविकास आघाडीतील ठाकरे शिवसेनेकडे उमेदवार असले तरी सहाही मतदारसंघांत राजकीय ताकद कमी आहे. याउलट काँग्रेसची स्थिती आहे. हातकणंगले मतदारसंघात महाविकास आघाडी राजू शेट्टी यांनाच बाय देण्याच्या स्थितीत दिसते.

कोल्हापूर मतदारसंघ १९७१ पासून तब्बल सातवेळा या पक्षाकडे राहिला. पक्षात फुट पडून राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर १९९९ ला पक्षाचे दोन्ही मतदारसंघातील उमेदवार अनुक्रमे उदयसिंहराव गायकवाड आणि कल्लाप्पाण्णा आवाडे यांचा पराभव झाला. कोल्हापुरात त्यानंतर काँग्रेसच्या वाट्याला ही जागाच आली नाही. इचलकरंजीत मात्र जातीच्या राजकारणाचा विचार करून राष्ट्रवादीनेच ही जागा काँग्रेसला दिली व तिथे कल्लाप्पाण्णा आवाडे २०१४ ला लढले; परंतु त्यांचा पराभव झाला.

ठाकरे गटात फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेले. त्यामुळे त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे. आता भाजप-शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी ही पक्षीय ताकद तसेच केंद्र व राज्यातील सत्तेची आर्थिक, माध्यमीय ताकद त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे हे आव्हान तगडे आहे; परंतु तरीही वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये शिंदे शिवसेनेच्या चौदापैकी दोनच जागा (श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळेे) सुरक्षित असल्याचे चित्र पुढे येत आहे. ते तसेच कायम राहिल्यास भाजपकडून उमेदवार बदलण्याची शक्यता जास्त आहे. खासदार संजय मंडलिक व खासदार माने यांना भाजपने आजही स्वीकारलेले दिसत नाही.

कोल्हापूर लोकसभेचे १९७१ पासूनचे खासदार

१९७१ : राजाराम दादासाहेब निंबाळकर (काँग्रेस)
१९७७ : दाजीबा बळवंतराव देसाई (शेकाप)
१९८० : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९८४ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९८९ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९९१ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९९६ : उदयसिंहराव गायकवाड (काँग्रेस)
१९९८ : सदाशिवराव मंडलिक (काँग्रेस)
१९९९ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)
२००४ : सदाशिवराव मंडलिक (राष्ट्रवादी)
२००९ : सदाशिवराव मंडलिक (अपक्ष-काँग्रेस सहयोगी सदस्य)
२०१४ : धनंजय महाडिक (राष्ट्रवादी)
२०१९ : प्रा. संजय मंडलिक (शिवसेना)कोल्हापूर लोकसभा निवडणूक लढवण्याची काँग्रेसला तब्बल २५ वर्षांनंतर संधी आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here