ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे ( Ravindra Berde ) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून ते घशाच्या कर्करोगाने ते त्रस्त होते. काही महिन्यांपासून टाटा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
दोन दिवसांपूर्वीच रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. अचानक त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत (Ravindra Berde Passed Away) मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे सख्खे बंधू होते. लक्ष्मीकांत यांच्यासोबत त्यांनी बऱ्याच सुपरहिट चित्रपटात काम केले आहे.
रवींद्र बेर्डे यांचा सिनेप्रवास (Ravindra Berde Movies)
वयाच्या विसाव्या वर्षी नभोवाणीशी आणि 1965 च्या काळात नाट्यसृष्टीशी रवींद्र यांची नाळ जोडली गेली. चंगू मंगू, एक गाडी बाकी अनाडी, हाच सुनबाईचा भाऊ, खतरनाक,हमाल दे धमाल, थरथराट, उचला रे उचला, यांसारख्या 300 हून अधिक मराठी चित्रपट आणि जवळपास पाच हिंदी चित्रपटातून त्यांनी काम केलं आहे. त्यांच्या निधनानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रवींद्र बेर्डे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आहेत. अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्याबरोबर त्यांची जोडी चांगलीच गाजली.
आजवर त्यांनी विविधांगी भूमिका केल्या आहेत. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे. रवींद्र बेर्डे यांनी सिंघम, चिंगी सारख्या हिंदी सिनेमांत आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.
बऱ्याच वर्षांपासून कर्करोगानं होते त्रस्त
रवींद्र बेर्डे यांना 1995 मध्ये ‘व्यक्ती आणि वल्ली’ या नाटकादरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011 मध्ये ते कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तोंड देत होते.
पण कलेशी एकरुप झाल्याने त्यांनी या संकटांवर मात केली होती. नाटकाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. कर्करोगाने त्रस्त असूनही ते नाटक पाहायला जात असत.
रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे सख्खे भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे होते. तर चुलत भाऊ पुरुषोत्तम बेर्डे हेदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत.
रवींद्र बेर्डे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत