कोल्हापूर विभागातील १६ साखर कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप, पंधरा हजार मजूर आलेच नाहीत

0
51

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखाने क्षमतेपेक्षा कमीने गाळप करत आहेत. परजिल्ह्यातील यंदा सुमारे १५ हजार मजूर कमी आल्याने अपेक्षित ऊस पुरवठा होत नसल्याने, रोज ६० हजार टनापेक्षा अधिकचा ऊस कमी पडत आहे.

स्थानिक ऊसतोड मजूर असलेले पश्चिमेकडील काही कारखान्यांचे गाळप जोरात सुरू आहे.

यंदा पाऊस कमी झाल्याने ऊस पिकांची वाढ अपेक्षित झालेली नाही. फेब्रुवारीपासून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा बसणार आहेत. पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने पिके जगविणे मुश्कील होणार आहे.

अशा परिस्थितीत हंगाम वेळेत सुरू होईल, असे वाटत होते. मात्र, ऊस दराच्या आंदोलनामुळे महिनाभर हंगाम पुढे गेला. महिनाभर झाले हंगाम सुरू होऊन, आता हंगामाने गती घेणे अपेक्षित होते.

मात्र, कोल्हापुरातील ९ व सांगलीतील ७ कारखान्यांचे क्षमतेपेक्षा कमी गाळप होत आहे. या कारखान्यांना रोज सरासरी ६० हजार टनांपेक्षा अधिक तुटवडा भासत आहे. आता ही परिस्थिती आहे, तर हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात काय करायचे, असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे.

उताऱ्यात यंदा ‘राजारामबापू’च आघाडीवर

साखर उताऱ्यात पहिल्या महिन्यात सांगली जिल्ह्यातील राजारामबापू सहकारी साखर कारखाना व त्यांचेच करंदवाडी युनिट आघाडीवर आहे. त्या पाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभी कासारी कारखान्याचा उतारा राहिला आहे.

या कारखान्यांनी केली इथेनॉलची निर्मिती

कोल्हापूर : ‘वारणा’, ‘दत्त-शिरोळ’, ‘उदयसिंगराव गायकवाड’, ‘डी.वाय. पाटील’, ‘गुरुदत्त’, ओलम ॲग्रो, दौलत
सांगली : दत्त इंडिया-सांगली, सोनहिरा-कडेगाव, उदगीर शुगर, सद्गुरू श्री.श्री-राजेवाडी

विभागात दीड लाखांहून अधिक मजूर
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात स्थानिकचे ५० हजार, तर परजिल्ह्यातील एक लाख असे दीड लाखाहून अधिक मजूर ऊस तोडणीचे काम करतात. मात्र, यंदा १५ ते १६ हजार परजिल्ह्यातील मजूर आलेलेच नाहीत. त्यामुळे ऊसपुरवठ्याचा गुंता तयार झाला आहे.

क्षमतेपक्षा कमी गाळप करणारे कारखाने

कारखाना – क्षमता – सध्याचे गाळप
वारणा – १२ हजार – १० हजार
दत्त-शिरोळ – १२ हजार – १० हजार ८१०
शाहू-कागल – ७ हजार ५०० – ७ हजार ३५०
जवाहर-हुपरी – १६ हजार – १४ हजार १००
राजाराम-कसबा बावडा – ३ हजार ५०० – ३ हजार २५०
गायकवाड – ६ हजार – ४ हजार ७६०
गुरुदत्त-टाकळीवाडी- ६ हजार – ५ हजार ४२०
संताजी घोरपडे – ८ हजार – ६ हजार २७५
इंदिरा-तांबाळे – ४ हजार – ३ हजार ६०२

ऊसतोड मजुरांची नवी पिढी या व्यवसायात येत नाही. इतर राज्यांच्या तुलनेत येथे मजुरी कमी असल्याने मजूर येत नाहीत. यंदा सरासरी १२ टक्के मजूर आलेले नाहीत. – डॉ.सुभाष जाधव (सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी-वहातूक संघटना)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here