बेळगाव विमानतळाचा मुद्दा बुधवारी बेळगावातील अधिवेशनात चर्चेचा मुद्दा ठरला अनेक आमदारांनी विषय मांडताना बेळगावच्या विमानतळाचा उल्लेख केला

0
55

बेळगाव : बेळगाव विमानतळाचा मुद्दा बुधवारी बेळगावातील अधिवेशनात चर्चेचा मुद्दा ठरला अनेक आमदारांनी विषय मांडताना बेळगावच्या विमानतळाचा उल्लेख केला. नामकरण असेल, विकास असेल किंवा विमानसेवा असेल, अशा अनेक मुद्द्यात विमानतळाचा उल्लेख ऐकायला मिळाला.

विमानतळाच्या विकासावरून दक्षिण आणि उत्तर आमदारात कलगीतुरा रंगला आणि तू तू-मै मै झाले.

विधासभेत दक्षिण आमदारांनी उत्तर कर्नाटकाच्या चर्चेत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सांबरा विमानतळाचा विस्तार रखडला आहे. धावपट्टीचे काम सुरू होणे आवश्यक आहे.

अनिल बेनके आमदार असताना बेळगाव ते सांबरापर्यंत रस्ता रूंदीकरणाला प्रारंभ झाला. सुरुवातीला चार किलोमीटर रस्ता रूंदीकरण झाला. पण, उर्वरित चार किलोमीटरचे काम रखडले आहे.

त्यामुळे आठ किलोमीटरसाठी 25 मिनिटे लागतात. केंद्र सरकारने विस्तारासाठी निधी मंजूर केला आहे. पण, भूसंपादन झालेले नाही. विमानतळाला आंतरराष्ट्रीय रूप देणे आवश्यक आहे. त्यामुळे लवकरात लवकर भूसंपादन व्हावे, अशी मागणी केली.

यावर आक्षेप घेत उत्तर आमदारांनी सांबरा विमानतळावर दिवसा आणि रात्रीही विमानतळे उतरत होती. लोकांचा मोठा प्रतिसाद लाभत होता. पण, येथील विमानसेवा हुबळीला कोणी नेली, यावरही चर्चा करण्यात यावी, अशी मागणी अध्यक्ष यु. टी. कादर यांच्याकडे केली.

त्यामुळे दक्षिण आमदारांनी या विषयात जाणीवपूर्वक राजकारण करू नये, असे सांगितले. त्याला तुम्हीच राजकारण करत आहात, असे उत्तर आमदारांनी प्रत्युत्तर दिले.

यावेळी विमानतळ विषयावरून दोन्ही आमदारांत चांगलीच तू तू-मै मै रंगली. दक्षिण आमदारांनी काँग्रेसने 50 वर्षात बेळगावचा विकास केला नाही. संभाजी पाटील महापौर असताना महापालिकेने सरकारकडे 50 लाखांचे कर्ज मागितले होते.

पण, तेही देता आले नाहीत. बेळगावच्या विकासासाठी काँग्रेसने एक रुपयाही दिला नाही, असा आरोप केला. यावेळी दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप झाले.

दरम्यान, लहान मुलांसारखे भांडू नका, अशा कानपिचक्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी दिल्या . दोन्ही आमदारांतील एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्यामुळे विधानसभा अध्यक्ष यु. टी. कादर यांनी दोघांनाही खडे बोल सुनावले. दोघेही बेळगाव शहराचे आमदार आहात. शाळेतील लहान मुलांसारखे भांडू नका. एकत्र बसून चर्चा करा, असा सल्ला त्यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here