जिथे गवत कापत होती, तिथेच वाघ होता दबा धरुन, नवेगावमध्ये हल्ल्यात महिला ठार

0
56

गडचिरोली: झाडू बनविण्यासाठी गवत कापण्याकरता जंगलात गेलेल्या महिलेवर वाघाने अचानक हल्ला केला. यात महिला जागीच ठार झाली. ही हृदयद्रावक घटना १५ डिसेंबरला तालुक्यातील नवेगाव येथे घडली.

चालू वर्षातील वाघाच्या हल्ल्यातील हा सहावा बळी आहे.

मायाबाई धर्माजी सातपुते (५५,रा.गोविंदपूर ता.गडचिरोली) असे मयत महिलेचे नाव आहे. कुनघाडा (रै.)वनपरिक्षेत्रांतर्गत नवेगाव शिवारातील कक्ष क्र. १४० मध्ये मायाबाई या झाडू बनविण्यासाठी गवत कापण्याकरता गेल्या होत्या.

यावेळी त्यांच्यासमवेत गावातील इतर महिलाही होत्या. सर्व महिला गवत कापण्यात व्यस्त होत्या. मात्र, मायाबाई सातपुते या ज्या ठिकाणी गवत कापत होत्या, तेथेच वाघ दबा धरुन बसलेला होता.

वाघाने अवचित त्यांच्यावर हल्ला केला. गळ्याला मोठी जखम झाली असून रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. इतर महिलांनी आरडाओरड केल्यावर वाघाने तेथून धूम ठोकली.

घटनास्थळी कुनघाडा वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली. मयत मायाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

हल्ल्यांचे सत्र थांबेना

जिल्ह्यात गतवर्षी वाघाने २६ जणांचा जीव घेतला होता. यावर्षी पावसाळा संपल्यानंतर वाघ अधिक सक्रिय झाले असून हल्ल्यांचे सत्र सुरु आहे. आतापर्यंत पाच बळी गेले होते. नवेगावच्या घटनेने आता ही संख्या सहावर पोहोचली आहे. सध्या झाडू बनविण्यासाठी गवत कापणीची लगबग सुरु आहे. मात्र, वाघांच्या हल्ल्यांमुळे शेतीकामांसह गवत कापणीचे कामही प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here