कोल्हापुरात फुटबॉल सामन्यांचा थरार सुरु; शिवाजी मंडळाचा एकतर्फी विजय, झुंजार क्लबची पीटीएम ब संघावर मात

0
69

कोल्हापूर : बलाढ्य शिवाजी तरुण मंडळ संघाने शुक्रवारी येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू झालेल्या शाहू छत्रपती केएसए स्पर्धेत फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळावर २ -० असा एकतर्फी विजय मिळवून यंदाच्या हंगामातील स्पर्धेला शानदार प्रारंभ केला.

त्यापूर्वी झुंजार क्लबच्या विकी रजपूतने हंगामातील पहिली हॅटट्रिक केली. त्याच्या जोरावर संघाने पीटीएम ब संघावर ३ -२ असा विजय मिळवला.

श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी यांच्यातील सामन्यात ‘शिवाजी’च्या खेळाडूंनी प्रथमपासूनच खेळावर पकड ठेवली. संकेत साळोखे याच्या फ्री किकवर योगेश कदमने दहाव्या मिनिटाला हेडद्वारे गोल नोंदवल

या गोलनंतर ‘शिवाजी’चे खेळाडू आक्रमक झाले. करण चव्हाण-बंदरे, इंद्रजित चौगुले, संकेत साळोखे, संदेश कासार, योगेश कदम यांनी खोलवर चढाया केल्या.

प्रत्युत्तरादाखल ‘फुलेवाडी’च्या सोविक घोषाल, सिद्धार्थ पाटील, रोहित जाधव, इम्रान खान, निरंजन कामते, ऋतुराज संकपाळ यांनी प्रयत्न केले. पूर्वार्धात १-० अशी गोलसंख्या होती.

उत्तरार्धात ‘फुलेवाडी’चा रोहित जाधवचा डाव्या पायाचा फटका गोल पोस्टच्या जवळून गेला. सोविक गोशालचा फटका ‘शिवाजी’चा गोलकीपर मयुरेश चौगुलेने पंच करून बाहेर काढला.

४७ व्या मिनिटाला ‘शिवाजी’च्या करण चव्हाण-बंदरे यांच्या पासवर संकेत साळोखे याने गोल नोंदवत २-० अशी भक्कम आघाडी घेतली. ‘फुलेवाडी’च्या खेळाडूंकडून गोलसाठी शर्थीची धडपड केली.

दरम्यान, दुपारच्या सत्रात झुंजार क्लब संघाने पीटीएम ब संघावर ३-२ अशी मात केली. पीटीएम ‘ब’चा युनूस पठाणने १५ व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला पहिला गुण मिळवून दिला, ३९ व्या मिनिटाला श्रेयस मुळीकने गोल केला.

पूर्वार्धाच्या वाढीव वेळेत ‘झुंजार’चा खेळाडू विकी रजपूत याने ४० व्या मिनिटाला सलग दोन गोल नोंदवून सामना बरोबरीत आणला. पूर्वार्धातील गोल संख्या २-२ अशी होती. उत्तरार्धात त्याने ७९ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत संघाला विजय मिळवून दिला. हंगामातील आणि स्पर्धेतील त्याच्या या पहिल्याच हॅटट्रिकला प्रेक्षकांनी जोरदार जल्लोष करत प्रोत्साहन दिले.

..यांच्यावर ‘रेड कार्ड’ची कारवाई

गतवर्षीच्या हंगामात ‘रेड कार्ड’ची कारवाई झाल्यामुळे शिवाजीच्या सुयश हांडे, सुमित जाधव, रोहन आडनाईक या तीन खेळाडूंना यंदाच्या पहिल्या सामन्यात खेळता आले नाही. या खेळाडूंनी मैदानात टी शर्ट काढून जल्लोष केल्याने ही कारवाई केली.

आजचे सामने
दुपारी १:३० वाजता : बीजीएम स्पोर्टस् विरुद्ध सोल्जर ग्रुप
दुपारी ४:०० वाजता : दिलबहार तालीम विरुद्ध संयुक्त जुना बुधवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here