हुपरी : विविध उद्योगांची उभारणी करून मोठा लाभ मिळवून देण्याच्या आमिषाने येथील राजू नामक महाठकसेनने सुमारे ३५० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तोंडी माहिती निमितसागर महाराज यांनी हुपरी पोलिसांना दिली.
ही रक्कम परत मिळावी यासाठी महाराजांनी सोमवारी दुपारपासून त्या ठकसेनच्या हुपरी (ता. हातकणंगले) येथील शिवाजीनगरातील दारातच उपोषण सुरू केले.
माझ्या सांगण्यावरून राज्यांतील विविध प्रांतातील श्रावकांनी ही रक्कम गुंतवणूक केली असल्याने ही रक्कम परत न मिळाल्यास कोणत्याही क्षणी पेट्रोल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा निमितसागर महाराजांनी हुपरी पोलिस व पत्रकारांशी बोलताना दिला. त्यामुळे पोलिस हादरले आहेत.
या फसवणुकीची तक्रार मुंबई पोलिसांत दिली असल्याने आणखी तक्रार देणार नसल्याचे त्यांनी महाराज यांनी सांगितले. विविध प्रकारचे उद्योग उभारणी करणे, शेळी-मेंढी पालन तसेच विविध प्रकारच्या करन्सीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून देतो, असे आमिष दाखवले. या महाठकसेन राजूने आपल्या मधाळ बोलण्याने देशातील अनेक प्रांतांतील शेकडो जणांना कोट्यवधी रुपयांना फसविले आहे. त्याच्या विरोधात अनेक राज्यांतील विविध पोलिस ठाण्यांत गुन्हेही दाखल आहेत.
काही महिन्यांपूर्वीच त्याचे संपूर्ण कुटुंब जेलची हवा खाऊन परतले आहे. कर्जावू रक्कम घेणाऱ्या काहींनी आत्महत्या केल्या आहेत. काहींनी पोलिसांच्या माध्यमातून जुजबी रक्कम पदरात पाडून घेऊन तडजोडही केली आहे.
या महाठकसेन राजूच्या मधाळ व लाघवी बोलण्याला फसून निष्ठावंत श्रावकांना सांगून या राजूला थोडीथोडकी नाही तर तब्बल सुमारे ३५० कोटी रुपये दिल्याचे निमितसागर महाराज यांनी सांगितले. ही रक्कम परत मिळावी म्हणून श्रावकांनी महाराजांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. त्यामुळे वैतागलेल्या निमितसागर महाराजांनी वेगळाच पवित्रा घेतला असून त्यामुळे शहरवासीयांबरोबरच पोलिसही चक्रावले आहेत.
पोलिस बंदोबस्त
ठकसेन राजू याच्या दारातच निमितसागर महाराजांनी ठाण मांडले आहे. त्यांच्या बंदोबस्तासाठी फौजदार व दोन हवालदार दिवसभर तैनात होते. हेच महाराज यापूर्वी फेब्रुवारी ते जुलै २०२३ अखेर त्याच्या याच घरी वास्तव्यात होते. महाराज आणि ठकसेन राजू यांची ओळख उत्तूरच्या देशमाने यांच्या माध्यमातून झाल्याची माहिती स्वत: निमितसागर यांनी दिली. याचप्रकरणी देशमाने व राजू ठकसेन याच्यावर सदलगा (ता. चिक्कोडी) पोलिसांत गुन्हा दाखल आहे.
फसवणूक कितीची..?
निमितसागर महाराज यांनी गुंतवणूक केलेल्या पावत्याही दाखवल्या. यातील निम्म्याहून अधिक देवाण-घेवाणही बँकेच्या माध्यमातून झाली असल्याने ते व्यवहार तपासल्यावर नेमकी कितीची फसवणूक झाली हे उघड होण्याची शक्यता आहे.