कोल्हापूर : कोरोनाकाळात बंद केलेली सह्याद्री एक्स्प्रेस तांत्रिक कारणामुळे मुंबईपर्यंत सोडण्यात असमर्थता दर्शविणाऱ्या मध्ये रेल्वे प्रशासनाने ती गाडी विशेष रेल्वे म्हणून सह्याद्रीच्याच वेळेत पुण्यापर्यंत सोडण्याचा मध्यम मार्ग काढून प्रशासनाने प्रवासी आणि संघटनांचा रोष तात्पुरता थांबवण्यात यश मिळविले होते.
मात्र, आता या गाडीचे आरक्षण १ जानेवारीपासून घेतले जात नसल्याने ती ३१ डिसेंबरनंतर धावणार नसल्याने पुन्हा प्रश्न निर्माण होणार आहे.
दरम्यान, अरिहंत जैन फाउंडेशनने रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांच्याकडे सह्याद्री एक्स्प्रेस मुंबईपर्यंत पूर्ववत सुरू ठेवण्याची, तसेच ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सुरू करण्याची मागणी केली आहे.
कोरोनाकाळात बंद केलेली कोल्हापूर ते मुंबई ही सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत खासदार, आमदार आणि विविध संस्था, तसेच संघटनांनी वारंवार रेल्वेमंत्री आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे; परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही गाडी सुरू करण्यासाठी संबंधितांनी असमर्थता दर्शवली होती; परंतु या गाडीच्याच वेळेनुसार ती कोल्हापूर ते पुणे अशी विशेष रेल्वे दि. ३१ डिसेंबरपर्यंत सुरू केली. मात्र, त्याचे आरक्षण आता होत नाही.
महालक्ष्मी एक्स्प्रेसवर ताण
सह्यादी एक्स्प्रेस बंद असल्यामुळे सध्या कोल्हापूर ते मुंबई मार्गावर धावणाऱ्या महालक्ष्मी एक्स्प्रेसवर प्रवाशांचा ताण वाढला आहे. या गाडीतून प्रवास करणाऱ्यांची कायमपणे मोठी प्रतीक्षा यादी असते.
त्यामुळे सध्या कोल्हापूर ते पुणे मार्गावर धावणारी ही विशेष रेल्वे पूर्ववत कोल्हापूर ते मुंबईदरम्यान सुरू करावी, अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली आहे.
विशेष रेल्वे १ जानेवारीपासून पुण्याबरोबरच मुंबईपर्यंत सोडल्यास महालक्ष्मी एक्स्प्रेसवरील ताण २० टक्के तरी कमी होईल, रेल्वेला अतिरिक्त महसूलही मिळेल. याच्या जोडीला वंदे भारत एक्स्प्रेससाठी प्रयत्न करावेत, त्यामुळे पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित होतील. –जयेश ओसवाल, अध्यक्ष, अरिहंत जैन फाउंडेशन, कोल्हापूर