स्पाच्या नावाखाली कुंटणखाना; कोल्हापुरात चालकासह फ्लॅट मालकावरही गुन्हा; पाच पीडित महिलांची सुटका

0
253

कोल्हापूर : बागल चौकातील इंडिया पार्क इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील ग्लॅमरस फॅमिली स्पामध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी बुधवारी (दि. २०) दुपारी छापा टाकून कारवाई केली. पोलिसांनी कुंटणखान्यातून पाच पीडित महिलांची सुटका केली.

तसेच स्पा चालक नागेश रमेश बेळेण्णावर (वय ३१, रा. शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) आणि फ्लॅट मालक याशीर अब्दुल रशिद बागवान (रा. कदमवाडी, कोल्हापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला. अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बागल चौक परिसरातील इंडिया पार्क इमारतीमध्ये स्पाच्या नावाखाली कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना मिळाली होती.

त्यानुसार पंडित यांनी कारवाई करण्याच्या सूचना अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक विभागाला दिल्या. सहायक फौजदार मीनाक्षी पाटील यांच्या पथकाने बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ग्लॅमरस स्पा येथे छापा टाकला. यावेळी स्पामध्ये कुंटणखाना सुरू असल्याचे निदर्शनास आले.

पाच हजार रुपयांची रोकड, चार मोबाइल आणि निरोधची पाकिटे असा सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पाच पीडित महिलांची सुटका करून स्पा चालक आणि जागा मालकास ताब्यात घेतले.

याबाबत मीनाक्षी पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास शाहूपुरी पोलिसांकडून सुरू आहे.

पाच हजारातील फक्त आठशेच पीडित महिलांना

स्पा चालक नागेश बेळेण्णावर हा ग्राहकांकडून पाच हजार रुपये घेत होता. त्यातील केवळ ८०० रुपये पीडित महिलांना देत होता, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. अशा प्रकारचे अन्य स्पा आणि कॅफेवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here