कोल्हापूर: कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा होण्याऱ्या काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनच्या फुटीचे ग्रहण काही केल्या संपेनासे झाले आहे. राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर दरम्यान आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास पाईपलाईन फुटली.
यामुळे शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले.
यंदा पाऊस कमी झाल्याने पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहरात अनेक ठिकाणी आजही पाण्यासाठी ठणठणाट सुरु आहे. अशातच पाईपलाईनच्या गळतीमुळे तसेच फुटीमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
गेल्या काही दिवसापुर्वीच संभाजी नगर परिसरात व्हॉल फुटल्याने पाणी वाया गेले होते. पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांमध्ये संताप असतानाच दुसरीकडे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
अशातच आज काळम्मावाडी थेट पाईपलाईनची पाईप राधानगरी तालुक्यात फुटली. यामुळे शेतामध्ये पाणीच पाणी झाल्याने शेतीचे नुकसान झाले. आतापर्यंत अर्जुनवाडा, तळाशी, चंद्रे गावात ही पाईपलाईन तीनवेळेस फुटली आहे. यामुळे लाखो लीटर पाण्याबरोबरच शेतीचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभिर्यांने पाहणे गरजेचे आहे.