कोल्हापूर : राजेंद्रनगर येथील गुंड कुमार गायकवाड याच्या खुनातील प्रमुख संशयित आरोपी अमर माने याचा कळंबा कारागृहातील एक फोटो आणि वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जातानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
या घटनेमुळे पुन्हा एकदा कळंबा कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा खुलेआम वापर होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच कारागृह प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.
राजेंद्रनगर येथील गुंडांच्या दोन टोळ्यांमधील संघर्षातून कुमार गायकवाड याचा नोव्हेंबर २०२२ मध्ये टाकाळा येथे चौघांनी पाठलाग करून धारदार शस्त्राने निर्घृण खून केला होता. त्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित अमर माने याच्यासह चौघांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
यातील टोळीप्रमुख अमर माने याचे कारागृहातील काही फोटो आणि त्यावरून तयार केलेले व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर उपलब्ध असून, एक लाखाहून अधिक लोकांनी ते पाहिले आहेत. थेट कळंबा कारागृहात दबदबा निर्माण केल्याचा आणि विरोधकांना चिथावणी देणारा मजकूर यातून व्हायरल केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांशी संबंधित असलेल्या काही तरुणांनी हे व्हिडिओ स्टेटसला लावले आहेत.
या प्रकारामुळे कळंबा कारागृहात कैद्यांकडून राजरोसपणे मोबाइल वापरले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत कारागृह प्रशासनाला विचारणा केली असता, फोटो आणि व्हिडिओची तपासणी करून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती अधिका-यांनी दिली. संबंधित फोटो कळंबा कारागृहातील नसावेत, असा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. मात्र, या प्रकाराने खळबळ उडाली असून, कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.