इचलकरंजी : येथील विक्रमनगर परिसरातील एका घरात घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे स्फोट झाला. त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी झाली. तसेच प्रापंचिक साहित्यांचेही मोठे नुकसान झाले. सुरेखा सुभाष वाघमोडे असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत घटनास्थळ व गावभाग पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, विक्रमनगरातील आरगे मळा भागात राहणाऱ्या वाघमोडे कुटुंबीयांनी बुधवारी (दि.२०) रात्री नेहमीप्रमाणे घराची सर्व दारे व खिडक्या बंद करून झोपी गेले. गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सुरेखा वाघमोडे यांनी लाइट लावण्यासाठी हॉलमधील बटण सुरू केले असता घरात गॅस गळती होऊन साचून राहिलेल्या गॅसचा स्फोट झाला. त्यामुळे त्या जखमी झाल्या. स्फोटामुळे शेजारच्या घरांतील खिडकीच्या काचा फुटल्या.
आरगे मळा परिसरात मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. गावभाग पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत त्यांनी जखमी सुरेखा यांना रुग्णालयात हलविले. सुदैवाने त्यांची मुलगी व सासू आतील खोलीत झोपल्या असल्याने त्यांना इजा झाली नाही. तसेच हे दोन मजली घर असून, वरील मजल्यावरील कुटुंबीयही सुखरूप आहेत.
घटनेनंतर गॅस एजन्सीच्या प्रतिनिधींनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यामध्ये गॅस गळती होऊन स्फोट झाल्याचे आढळले आहे. घरामध्ये रात्रभर गॅसची गळती होऊन तो गॅस साचून राहिला होता. लाइट लावताना बटणामध्ये झालेल्या स्पार्कमुळे साचलेल्या गॅसचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.
स्फोटाच्या तीव्रतेने भिंत फुटली
या स्फोटाची तीव्रता भयानक होती. वाघमोडे यांच्या घराच्या पुढील बाजूची भिंत फुटून पूर्ण चौकटीसह दोन दरवाजे काही अंतरावर संरक्षक भिंतीजवळ जाऊन पडले होते. तसेच घरातील तीन दरवाजे, तिजोरी, इतर साहित्य मोडून पडले.