केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीचा फटका सोयाबीन उत्पादकांना, दोन वर्षांपासून दरात घसरण

0
121

यंदा सोयाबीनचे उत्पादन कमी होऊनही गेल्या तीन महिन्यांत दरात कमालीची घसरण सुरू आहे. खाद्यतेलाबाबतचे केंद्र सरकारचे धोरणाचा फटका सोयाबीन उत्पादकांना बसला आहे.

सध्या बाजारात प्रतिक्विंटल ४८०० रुपये दर असून उत्पादन खर्च पाहता, शेतकऱ्यांच्या पदरात सोयाबीनचे गोणपाटही राहत नाही. गेल्या वर्षी दर वाढतील, या आशेपोटी सात-आठ महिने सोयाबीन घरात ठेवले आताही तीच वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीनचे ५५ हजार हेक्टर क्षेत्र होते. मात्र, दरातील अस्थिरतेमुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवड हळूहळू कमी होत लागली असून, हे क्षेत्र ४२ हजार २७४ हेक्टरवर आले आहे.

यंदा खरिपात तर केवळ ३६ हजार ४७३ हेक्टरवर पेरणी झाली; पण उशिरा आलेला पाऊस, त्यातच ऑगस्ट महिन्यात पडलेला पावसाचा खंड, कीड-रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात निम्म्याने घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

यंदा सोयाबीनचे उत्पादन घटूनही बाजारात मात्र अपेक्षित दर मिळत नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत सरासरी पाचशे रुपयांनी दर कमी मिळत आहेत. यासाठी केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातविषयक धोरण कारणीभूत मानले जात आहे.

वर्षभरात दीडशे लाख टन खाद्यतेलाची आयात

केंद्र सरकारने खाद्यतेलाचे दर स्थिर ठेवण्यासाठी गेल्या वर्षभरात १५५ लाख टन खाद्यतेलाची आयात केली आहे. आयातीवरील शुल्क ३५ टक्क्यांवरून ५.५० टक्क्यांवर आणल्याने सूर्यफूल व सोयाबीन तेलाच्या आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा लाख टनाने आवक वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दृष्टिक्षेपात सोयाबीनचे क्षेत्र व उत्पादन

  • क्षेत्र – ४२ हजार २७४ हेक्टर
  • पेरणी – ३६ हजार ४७३ हेक्टर
  • उत्पादन – ६३ हजार ८२७ टन
  • सरासरी दर – ४८०० रुपये प्रतिक्विंटल

गेल्या सप्टेंबरपासून घाऊक बाजारात असा राहिला दर, प्रतिक्विंटल

३० सप्टेंबर – ४७७५ ते ४८१०
१ ऑक्टोबर – ४६९५ ते ४७३०
१५ ऑक्टोबर – ४५८० ते ४६१०
३० ऑक्टोबर – ४७०० ते ४७५५
१ नोव्हेंबर – ४७७० ते ४८००
१५ नोव्हेंबर – ५२३५ ते ५२६५
३० नोव्हेंबर – ५०३० ते ५०६५
१ डिसेंबर – ४८४० ते ४८७५
१५ डिसेंबर – ४८९५ ते ४९३०
२० डिसेंबर – ४८२५ ते ४८८०

यंदा एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळाले आहे. उत्पादन खर्च पाहता सध्याच्या दराने काहीच पदरात पडत नाही; पण किती दिवस घरात सोयाबीन ठेवायचे? -दादासाहेब पाटील, शेतकरी, जयसिंगपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here