नवे पारगाव : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील विश्वजित श्यामराव पाटील याने एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. पाच वर्षांच्या खडतर परिश्रमाने विश्वजितने यश मिळविल्याने पारगावचे नाव उज्ज्वल झाल्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.
विश्वजितची गावातून मिरवणूक काढत गावाने आनंद साजरा केला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दुय्यम निबंधक ( सब रजिस्टर ) २०२२ चा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये ४०० पैकी ३०६ गुण संपादन करून विश्वजित पाटीलने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
विश्वजितचे प्राथमिक शिक्षण गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या पाराशर हायस्कूलमध्ये झाले. तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनियर पदवी संपादन केली.
त्याच्या यशात आई-वडील, भाऊ यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. वडील श्यामराव पाटील हे निवृत्त मुख्याध्यापक आहेत तर आई गृहिणी आहे. या परीक्षेसाठी त्याला श्रीनिवास पाटील व श्रेयस बडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी विश्वजितचे अभिनंदन केले.