प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा.
नवी दिल्ली : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI)भारतीय कुस्ती महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्याविरोधात केंद्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. केंद्र सरकारने आता संपूर्ण कुस्ती संघटनेलाच बरखास्त करुन संजय सिंह यांना निलंबित केले आहे. त्यामुळे आता संजय सिंह हे रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहणार नाहीत.भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यामध्ये कुस्तीपटू अनिता शेओरान यांचा पराभव झाला होता. या निकालानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती. यानंतर मोदी सरकारने यावर कारवाई करत नव्या कुस्ती संघटनेला निलंबित केले आहे. तसेच कुस्ती संघटना रद्द करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे.