कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोर आज, सोमवारी सकाळच्या सुमारास चिरे वाहतूक करणारा ट्रक क्रमांक (एम.एच. ०७ सी- ६१५४ ) पलटी होऊन अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
प्रसाद आहेर (वय-२१, तळेबाजार, देवगड), किशोर जंगले (३०, पिसेकामते ), दिलीप शेलार (५५, नांदगाव ) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तत्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. ते किरकोळ जखमी असल्याने त्यांना औषधोपचार करून घरी पाठविण्यात आले.
मुंबई- गोवा महामार्गावर कणकवलीहुन ओरोसच्या दिशेने जाताना गुरे आडवी आल्याने ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे ट्रक पलटी होऊन अपघात झाला. दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवित हानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखेचे पोलिस पथक तसेच कणकवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते. तसेच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती.
जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्यात आला. तर वागदे येथील विनसम क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व कणकवली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील चिरे तसेच चिऱ्यांची पडलेली लालबुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकीस सुरळीत केला. त्यांना ग्रामस्थ तसेच पोलिसांनी मदत केली. पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.