कोल्हापूर : एकदा का राजकीय संदर्भ बदलले की मग कोण कोणाच्या गाडीवर डबलसीट बसेल हे सांगता येत नाही. याचे प्रत्यंतर सोमवारी कोल्हापूरमध्ये आले.
खासदार धनंजय महाडिक यांनी बुलेटला किक मारली आणि त्यांच्या पाठीमागे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांड ठोकली आणि हे हल्ली न दिसलेले दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार आणि कार्यकर्त्यांची धावपळ उडाली.
धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादीच्यावतीने खासदार करण्यात हसन मुश्रीफ यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे महाडिक कधीही मुश्रीफ समोर दिसले की त्यांना वाकून नमस्कार करतात.
मधल्या काळात राष्ट्रवादीत असूनही महाडिक यांचा पराभव झाला आणि सतेज पाटील यांन ‘आमचं ठरलंय’ म्हणत संजय मंडलिक यांना निवडून आणले. नंतर महाडिक भाजपमध्ये गेले आणि मुश्रीफ हे राजकीयदृष्ट्या त्यांचे विरोधक बनले. परंतू तरीही मुश्रीफ आणि महाडिक यांच्यात फारसे कधी वाकडे आले नाही.
आता तर मुश्रीफ हे अजित पवारांसोबत महायुतीत येवून कोल्हापूरचे पालकमंत्री झाल्याने साहजिकच हे या दोघांच्यातही राजकीय जवळीक वाढायला लागली आहे. सोमवारी पोलिस दलातील नव्या वाहनांचे उद्घघाटन या सर्व मान्यवरांच्या हस्ते होते.
वाहनांची पूजा झाल्यानंतर महाडिक यांना बुलेट चालवण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी मुश्रीफ यांना पाठीमागे घेतले आणि मैदानावर फेरी मारली. आता लोकसभेच्या प्रचारात ही जोडी महायुतीच्या विजयासाठी अग्रभागी राहणार आहे. याची झलकच यानिमित्ताने पहावयास मिळाली.