Health Tips : सध्या देशभरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. दरम्यान, या हिवाळ्याच्या दिवसात वेगवेगळे आजार डोकं वर काढतात. सर्दी, खोकली, शरीर अकडणे या समस्या हिवाळ्यात कॉमन असतात. या व्याधींपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी पूरक आणि संतुलित आहार घेणे फायद्याचं ठरतं.
तर मग हिवाळ्यात कोणत्या गोष्टींचा आहारात समावेश केला पाहिजे, जाणून घेऊया.
दसरा, दिवाळी उरकली की आगमन होते ते थंडीचे. ऑक्टोबर हिटपासून लाहीलाही झालेल्या शरीराला थंडावा देखील या ऋतुमध्ये मिळतो. पण ही गोड गुलाबी थंडीसोबत येताना आजारांनाही घेऊन येते. या काळात प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे पदार्थ आहार घेतल्यास फ्लू, ताप, खोकला, सर्दी हे आजार बरे होऊ शकतात.
कांदा- हिवाळ्यात कांदा खाणे शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. सुपरफूड कांदा आरोग्यासाठी रामबाण ठरतो. हिवाळ्यात कांदा शरीर उबदार ठेवण्यासह विविध संक्रमण आणि आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे हिवाळ्यात बाजरी, साजूक तूप, इत्यादी गरम पदार्थांसह कांद्याचाही आहारात समावेश करा.
बाजरी- थंड दिवसांमध्ये ग्लूटेन फ्री बाजरी खाणे उत्तम ठरतं. हिवाळ्यात बाजरीच्या तांदळाचा आहारात समावेश करावा. वेगवेगळ्या रोगांपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी बाजरीची भाकरी जरुर खावी.
तुप- आयुर्वेदानूसार,तुप हा हिवाळ्यात अनादी काळापासून जाणारा पदार्थ आहे. या दिवसांमध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे रोगांशी लढण्याची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तुपाचा आहारात समावेश करण्याचा सल्ला आहारतज्ञ देतात.
अद्रक- हिवाळ्यात शरीराला उबदार तसेच निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात अद्रकाचा समावेश करणे गरजेचे आहे. आल्यामध्ये असणारे अॅंटी-ऑक्सिडंटचे गुणधर्म सर्दी, खोकला यांसारख्या संक्रमित रोगांपासून बचाव करतात. त्यामुळे आयुर्वेदातही आल्याचा वापर गुणकारी सांगितला आहे.
बदाम, काजू- अनेकदा रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी डॉक्टरांकडून आहारात सुका मेव्याचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. बदाम, काजुमध्ये मोठ्या प्रमाणात कर्बोदके आढळतात. त्यासाठी हिवाळ्यात शरीरातील उबदारपणा वाढविण्यासाठी सुका मेवा खाणे महत्वाचे आहे.