प्रतिनिधी : वैभव प्रधान
सध्या पुरुषांच्या इतकेच मानाचे आणि समान दर्जाचे स्थान महिलांना मिळाले आहे, ते महिला सबलीकरण ही सावित्रीबाई फुले यांच्याकडून आधुनिक भारताला मिळालेली देणगी आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ. वैजयंता कदम पाटील यांनी केले. इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालय येथे सावित्रीबाई फुले असोसिएशन, राष्ट्रीय सेवा योजना यांचे वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या, अध्यक्षस्थानी प्राचार्य बी. एस. पाटील होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. कदम पाटील म्हणाल्या की, आजच्या काळात सबलीकरण, सशक्तीकरण आदी शब्द परवलीचे बनले असले तरी त्यामागे सावित्रीबाई यांच्या अथक परिश्रम, त्यांची वैचारिक मांडणी आणि त्यांनी प्रत्यक्ष उभी केलेली क्रांती यात या सर्वाचे श्रेय आहे.
यावेळी बोलताना प्रा. डॉ. रफिक सूरज म्हणाले की, ज्या काळात स्त्रियांना वेगवेगळ्या बंधनात जखडण्यात आले होते, त्या काळात सावित्रीबाईंच्या कार्याचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे, फक्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून थांबू नये त्यांच्या विचारांची चळवळ पुढं चालवणे, हे खरे अभिवादन असेल. यावेळी प्रा. शांताराम कांबळे यांनी खुमासदार शैलीत विद्यार्थ्यांशी सावित्रीमाई फुले यांच्या चरित्रातील अनेक घटनांबाबत संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलत असताना प्राचार्य बी एस पाटील यांनी विद्यार्थी केंद्रित शिक्षणाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांनी केली आहे, असे मत व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पद्घतीने आपले विचार मांडले.
स्वागत प्रास्ताविक प्रा. डॉ. माधुरी खोत यांनी केले, आभार प्रा. यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. जयश्री कांबळे यांनी केले. यावेळी प्रा. शांताराम कांबळे, प्रा. गजेंद्र माळी, प्रा.डॉ. मोहन जोशी, प्रा.डॉ. वसंत भागवत, प्रा. विजयकुमार साठे, प्रा. संपत जाधव, प्रा. डॉ. कपिल राजहंस, प्रा. अक्षय सावंत आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.