प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. असाच एक अजब प्रकार झारखंडमधून समोर आला आहे. कारण प्रियकराने नकार देताच प्रेयसीने त्याच्या घरासमोर धरणे आंदोलन केले.
या प्रेमवेड्या प्रेयसीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. दुखावलेली तरुणी गेल्या ४८ तासांपासून प्रियकराच्या घरासमोर धरणे आंदोलन करत आहे. कडाक्याच्या थंडीत उघड्यावर बसलेल्या संबंधित तरूणीने सांगितले की, जोपर्यंत तिचा प्रियकर तिच्याशी लग्न करण्यास होकार देत नाही तोपर्यंत ती येथून हलणार नाही. मुलाच्या कुटुंबीयांनी दरवाजा बंद केला आहे. कुटुंबातील एकही सदस्य बाहेर पडत नसल्याचे ती सांगते.
बिहारमधील धनबाद जिल्ह्यातील रामकुंडा आमतांड या गावातील ही घटना आहे. ही तरुणी गिरिडीह जिल्ह्यातील रहिवासी आहे. रामकुंडा आमतांड येथे राहणारा रोहित कुमार याच्यासोबत तिचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते, असे तिचे म्हणणे आहे. या काळात दोघेही अनेकदा भेटले आणि फोन कॉल्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहिले.
प्रेयसीचं धरणे आंदोलन
दरम्यान, या तरुणाने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र आता तो तिच्याशी लग्न करण्यास नकार देत आहे. त्याने बोलणेही बंद केले. आंदोलनाला बसलेली मुलगी लोकांना तिचे रोहितसोबतचे चॅटिंग, व्हिडीओ आणि फोटो दाखवत आहे. आरोपी तरुण फरार झाला असून त्याचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नसल्याचे कळते. मुलीचे आधीच लग्न झाले असल्याचा दावा रोहितच्या घरच्यांनी केला.
विशेष बाब म्हणजे तरुणीने सांगितले की, यापूर्वी ज्या तरुणाशी तिचे लग्न झाले होते, त्याला तिची संमती नव्हती. दोघेही खूप वर्षांपूर्वी वेगळे झाले. मुलीचे असेही म्हणणे आहे की, तिने तिच्या भूतकाळातील सर्व काही रोहितला सांगितले होते आणि त्यानंतर त्यांच्यात नवीन नातं निर्माण झालं. पण ऐनवेळी रोहितने लग्नाला नकार दिला.
तरूणीने दिलेल्या माहितीनुसार, तिने नोव्हेंबर महिन्यात पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी दोघांचे लग्न लावून देण्याचे सांगितले होते, मात्र रोहितच्या घरच्यांनी नकार दिला. सोमवारी दुपारपर्यंत मुलीचे आंदोलन सुरूच होते. तिला काही झाले तर त्याला रोहित आणि त्याचे कुटुंब जबाबदार असेल असे तिने सांगितले.